धोत्रीचा गोकुळ शुगर यावर्षी उच्चांकी दराची परंपरा कायम राखेल : शिंदे; गोकुळ शुगरच्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ
अक्कलकोट, दि.२२ : धोत्रीचा गोकुळ शुगर कारखाना मागच्या दोन वर्षात अडचणीत होता ही गोष्ट खरी आहे पण मागच्या गळीत हंगामातील सर्व देणी पूर्ण केली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या उसाला पुन्हा उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखू, अशी ग्वाही चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर दत्ता शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. शुक्रवारी, सकाळी धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथेm गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमीटेडच्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ व मोळी पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक बलभीमभाऊ शिंदे हे होते.
पुढे बोलताना चेअरमन दत्ता शिंदे म्हणाले, गेल्या वर्षी स्वर्गीय भगवानभाऊ शिंदे यांच्या निधनामुळे शिंदे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी आम्ही अडचणीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्या अडचणी समजून घेत सहकार्य केले ते कधीही न विसरण्यासारखे आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,सतेज पाटील, मधुकरराव चव्हाण, सुनील चव्हाण यांनी तर खूप मोलाचे सहकार्य आम्हाला केले. त्यामुळे उभे राहू शकलो. आजवर शेतकरी आमच्या पाठीशी उभे राहिले.आता आम्ही त्यांच्या सोबत असून यापुढे देखील कारखान्याला ऊस घालून त्यांनी पाठिशी उभे राहावे, अशी अपेक्षा केली. शेतकऱ्यांना दैवत मानून २०१८ साली २ हजार ६०० रूपये उच्चांकी दर दिला. काही कारणास्तव आम्ही अडचणीत आलो. पण आता पुन्हा तुमच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगत कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या सर्व शेतकरी व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना बलभीम भाऊ शिंदे म्हणाले, कठीण काळात शेतकरी आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच आम्ही या सगळ्या अडचणीचा सामना करत पुन्हा उभा राहिलो असे सांगून या हंगामासाठी कारखाना पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. चपळगावचे नेते बसवराज बाणेगाव म्हणाले, स्वर्गीय भगवान शिंदे याच्या जाण्याने शिंदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यातून ते पुन्हा सावरले. त्यांच्या कारखान्याला ऊस घालून शिंदे घराण्याचे हात बळकट करावे, असे आवाहन केले. ज्येष्ठ नेते अंबण्णप्पा भंगे यांनी बावकरवाडी व चपळगावचे अनेक शेतकरी गोकुळ शुगरलाच ऊस घालण्याचा निश्चय केला असून शिंदे कुटुंबांनी धीर सोडू नये, असे सांगितले. यावेळी प्रदीप गायकवाड , अमर पाटील, अंबणप्पा भंगे, कल्याणराव पाटील, सागर जाधव आदींनी मनोगत व्यक्त करून शिंदे परिवाराच्या आणि कारखान्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर बाळासाहेब कुटे यांनी केले. व्यासपीठावर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे, प्रीती शिंदे, डायरेक्टर विशाल शिंदे ,वर्क्स मॅनेजर सिद्धेश्वर उमरदंड, प्रॉडक्शन मॅनेजर प्रकाश दिगडे, स्वामीराव पाटील, गणपत शिंदे, दत्ता तानवडे, विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्धार्थ गायकवाड, कैलास संतानी, तुकाराम बिराजदार, नारायण चव्हाण, सागर संतानी, कार्तिक पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी विविध गावचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.तर आभार अमरसिंह शिरसागर यांनी मानले.
६ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट
या वर्षीच्या गळीत हंगामासाठी १३ हजार हेक्टर उसाची नोंद झाली असून त्यापैकी ८ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार आहे. ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. प्रतिदिन ३ हजार ५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असल्याने हा हंगाम आम्ही यशस्वी करू – दत्ता शिंदे, चेअरमन गोकुळ शुगर