अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट येथे येत्या रविवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी समर्थ नगरी प्रतिष्ठान व डॉ. हेरंबराज पाठक गौरव समितीच्यावतीने लेखक डॉ.हेरंबराज पाठक यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समर्थ नगरी प्रतिष्ठान व गौरव समितीच्या वतीने बुधवारी देण्यात आली. हा कार्यक्रम एसटी स्टँड समोरील लोकापुरे मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी साडेदहा वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमास खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, ह.भ.प सद्गुरु गहिनीनीनाथ महाराज औसेकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश देवकर, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, पंढरपूरचे कार्यकारी अभियंता नंदकुमार आरगकर,श्री स्वामी समर्थ सेवा परिवाराचे संदीप म्हात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी शंकरराव पाठक (शास्त्री) यांच्या चरित्रावरील आधारित ‘अथ योगिया दुर्लभ ‘या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे तसेच दैनिक संचारमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक लेखांवर आधारित ‘तू सखा आणि मी भक्त’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी होणार आहे तसेच आपल्या नोकरीच्या काळामध्ये आलेल्या अनुभवांवर आधारित ‘आठव आठवणींचा’ या मान्यवरांच्या प्रतिक्रियावर आधारित पुस्तक प्रकाशन होणार आहे.
याच कार्यक्रमात संयोजन समितीच्यावतीने डॉ.हेरंबराज पाठक यांचा सपत्नीक सेवानिवृत्तीनिमित्त गौरव सोहळा होणार आहे.हा सोहळा अक्कलकोटमधील विविध नामांकित संस्थांच्यावतीने केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.