अक्कलकोट,दि.२४ : राज्य शासनाने कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांची माहिती घेण्यासाठी उद्या दि. २५ व २६ डिसेंबर
रोजी अक्कलकोट जुने तहसील कार्यालय व नगरपरिषद कार्यालय येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट व मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली.
या योजनेद्वारे लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकाने ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करताना अर्जदाराचा स्वतःचा तपशील, आधार क्रमांक,
अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील,मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, आधार क्रमांक, मृत पावलेल्या व्यक्तीचा जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम-१९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र तसेच दवाखान्याचे मृत्यू प्रमाणपत्र, ICMR कोड क्रमांक, इतर निकट नातेवाईंकांचे ना हरकत असल्यांचे स्वयं घोषणापत्र आवश्यक आहे.
सदर सर्व कागदपत्रे घेऊन अर्जदारांनी स्वतः शनिवार व रविवार या दिवशी अक्कलकोट येथील कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.