सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून सर्वच पक्ष उमेदवारी जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात आले असून नुतेच मराठा समाजाकडून सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यास 150 जण इच्छुक आहेत. त्यांचा मेळावा शनिवारी झाला. त्या इच्छुकांच्या मुलाखती रविवारी (दि. 20) अंतरवाली सराटी येथे होणार आहे. त्यावेळी उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्यांनी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज शैक्षणिक संकुलात घेतला. यावेळी गणेश देशमुख, राजन जाधव उपस्थित होते.
पवार म्हणाले, मराठा समाजाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील माजी सभापती, अधिकारी, मराठा आंदोलन नेते, पदाधिकारी हे मुलाखतीसाठी आले होते. त्यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून मीनल साठे, मोहोळमधून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती कल्पना क्षीरसागर यांचे पती राहुल क्षीरसागर, शहर उत्तर मतदारसंघातून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते रवी मोहिते, रिक्षाचालक पिंटू माने, बार्शीतून भाऊसाहेब आंधळकर, शहर मध्यमधून भक्ती जाधव, अनिल मस्के यांच्यासह दीडशे जणांनी मराठा समाजाकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.