ध्यास विश्वसार्ह बातमीचा

यंदाच्या “वेळ अमावास्य” ओमायक्रॉनच्या सावटाखाली साजरा, वाचा सविस्तर…

गुरुशांत माशाळ,
दुधनी : मार्गशीर्ष महिन्याची दर्शवेळा अमावास्या ही ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वन भोजनाचा आनंद देणारा सण आहे. ग्रामीण भागात वेळ अमावस्येला शेतकरी आणि शेतीशी निगडित सर्व नागरिक आवर्जून हजेरी लावतात. या दिवशी नातेवाईक आणि मित्र मंडळीना आमंत्रित केले जाते. यंदाच्या वर्षी वेळ अमावास्या रविवारी आल्याने शहरी भागातील नागरिक खेड्यांकडे आपला मोर्चा वळवला होता. यामुळे ग्रामीण भागातील शेतांमध्ये गर्दी झाली होती.

माणसाला निसर्गाजवळ नेऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते जोडणारा सण म्हणजे वेळ अमवाश्या. महाराष्ट्रातील सोलापुर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड तसेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कन्नड भाषिक सीमावर्ती भागात व कर्नाटकातील बेळगाव, विजयपूर, बीदर व कलबुरगी जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळ अमवाश्या अती उत्साहात साजरा केला जातो. कन्नड भाषेत या सणाला “यळ्ळ अमवाश्या” म्हणतात तर स्वातंत्र्यपूर्वी कन्नड संस्कृतीचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात या सणाला मूळ कन्नड शब्दाचा अपभ्रंश होऊन “वेळ अमवाश्या” म्हणून संबोधले जाते. या दिवशी गावातील सर्वंच लोक वनभोजनासाठी आपापल्या शेतात जातात.

या दिवशी शेतातील शमीच्या झाडाखाली पाच लहान गोलाकार दगडं रचून ‘पांडव पूजा’ करतात. पांडव पूजेच्या वेळी नैवेद्य म्हणून बाजरीची (तीळ लावलेली) पातळ भाकरी, बाजरीचे उंडे (कडबा), गरगट्टा ज्यात विविध पालेभाज्या, बोर, दाळ शिजवून केलेलं असते अर्थात भज्जी, (ढाबा संस्कृतीतील मिक्स व्हेज!) तुरीचे सपक दाळ, शेंगदाण्याची खमंग चटणी (हिंडी), आंबवलेला भात (हुळीबाना), खीर (हुग्गी), पु रण पोळी, ताक असे अनेक स्वादिष्ट खाद्य पदार्थ टोपलीत (डोळ्ळी/ढालीत) भरून डोक्यावर घेऊन येतात. ज्याच्या शेतात शमीचे झाड नसते त्यांनी कडबाच्या पाच पेंड्या रचून खोपं तयार करून त्यात पांडव पूजा करतात व एक ना अनेक खाद्य पदार्थांचे नैवेद्य दाखवतात, मग नंतर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून वनभोजनाचा आस्वाद घेतात. ज्यांना शेती नाही अशांना यावेळी आग्रहाने बोलून घेतात.

वेळामावस्येच्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो. आणि वेळामावस्येच्या पहाटे घराघरात चूल पेटते. बेसनपिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेले उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी. म्हणजे भज्जी… ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी, भज्जीसारखी अफलातून चव कशाला म्हणजे कशाला नाही … या डीशची तुलना कोणतेही पंचतारांकित हॉटेलही करु शकणार नाही…. या बरोबर दिले जाणारे अंबील म्हणजे तर राज दरबारी असलेले सगळे पेय फिके पडावेत असे… चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेल हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते.

काळाच्या ओघात अशा ग्रामीण भागातील पारंपरिक सणांचे महत्व कमी होत चालले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली ग्रामीण जीवनशैली लोप पावत चालली आहे. रब्बी पिकांच्या जागी ऊस, द्राक्ष, केळी व इतर फळांची नगदी पिकं आक्रमण केले आहेत. रब्बी पिकांचे खळं गायब झाले आहेत.‌ यांत्रिक पध्दतीच्या शेतीबरोबर पर्यावरण पूरक शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याच बरोबर निसर्गाशी निगडित सणासुदीचे प्रसंगही लोप पावत चाललेले आहेत.‌ ग्रामीण जीवनशैलीचे अवलंब करून समाधानी जीवन जगू या ! पारंपारिक सणांना महत्व देऊ या !! सर्वांना “यळ्ळ अमवाश्ये” च्या हार्दिक शुभेच्छा !!

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!