ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी समर्थांच्या मूळ गाभार्‍याचे नूतनीकरण मंदिर वास्तुशास्त्रानुसार होणार;ह.भ.प औसेकर महाराजांनी केली कामाची पाहणी

मारुती बावडे

अक्कलकोट : अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या मुळ गाभाऱ्याच्या दुरुस्ती व नूतनीकरण कामास प्रारंभ झाला असून या कामाची पाहणी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली.मंदिर वास्तुशास्त्रानुसार हे काम
सुरू असून भविष्यात अशाच पद्धतीने हे काम पूर्ण करून घ्यावे,अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

मंदिराचे जुने वैभव जे आहे ते कायम ठेवून नव्या स्वरूपात होत असलेल्या या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी त्यांना भविष्यातील संकल्पना आणि कामांची सविस्तर माहिती दिली.

आवश्यक ठिकाणी आकर्षक असे मार्बल, मुख्य सभा मंडपातील दगडाच्या खांबांना चांदीचा लेप,पूर्वीचे मुख्य द्वार हे देखील कायम ठेवून नवीन चांदीचे केले जाणार आहेत.तसेच समोरचा भाग जो आहे तो चांदीने व्यापणार आहे.मूळ गाभाऱ्यातील लहान मूर्ती जी आहे.ती मयूर आसनावर आरुढ येणार आहे.त्यानंतर विधिवत प्राण प्रतिष्ठापना केली जाईल.पूर्ण काम झाल्यानंतर मंदिरात पूजा अर्चा, होम हवन केले जाणार आहे.बाहेरचा भाग पीओपीने आकर्षक केला जाणार आहे,अशी माहिती इंगळे यांनी औसेकर महाराज यांना दिली.

जुन्या काही वस्तू कायम ठेऊन नव्या स्वरूपात हातानी काही रेखाटलेले स्वामींचे जीवन चरित्रावरील फोटो गाभाऱ्याच्या समोरच्या सभा मंडपात लावण्यात येणार आहेत,अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत ह.भ.प. श्रीरंग महाराज औसेकर,पप्पु गुरव,विजयकुमार बनसोडे, अनिकेत जवंजाळ, गुरूनाथ पतंगे, तुकाराम बनसोडे, नागेश कुंभार व मंदिर देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

◆ स्वामींचे दर्शन वेळोवेळी घेण्याचे भाग्य लाभते

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे’ या ओवीस अनुसरून आम्ही पंढरीचा पांडूरंग आणि अक्कलकोट स्वामींच्या भक्ती सहवासात नित्यपणे रमतो. त्यामुळे आपण कोठेही असलो तरी पांडुरंग आणि स्वामींचे रूप नेहमीच डोळ्यासमोर असतात आणि या प्रेरणेतून पांडुरंग आणि स्वामींचे दर्शन वेळोवेळी घेण्याचे भाग्य लाभते – ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!