अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात शहीद जवानांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दोन ठिकाणी हुतात्मा स्मारक होणार आहे. यामुळे शूर जवानांचे देशप्रेम आणि सैनिकांविषयी आदर प्रेम ग्रामस्थांमध्ये वाढणार आहे. घोळसगाव आणि बासलेगाव या दोन गावात होणाऱ्या स्मारकासाठी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घोळसगाव येथील शहीद जवान हुल्लप्पा शिवानंद गायकवाड हे जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना १९९७ साली शहीद
झाले होते. त्यांचे स्मृतिस्थळ व्हावे यासाठी घोळसगावकर गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते.त्यांच्या मागणीचा विचार करून त्या ठिकाणी तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्याशिवाय बासलेगाव येथे मोहन बाकु चव्हाण यांचा १९९२ साली अतिरेक्यांशी सामना करताना पंजाब येथे मृत्यू झाला होता. ह्या दोन्ही जवानांना कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले. याविषयी गावात देश प्रेम वाढावे यासाठी तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
याठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीच्या सहमतीने चांगल्या दर्जाचे स्मारक होणार आहे. यापूर्वी अशाच प्रकारे तानवडे यांच्या प्रयत्नातून वागदरी येथे शहीद जवान प्रभाकर पात्रे यांचे स्मारक झाले होते. त्या स्मारकालाही आम्हीच निधी दिला होता. वागदरी येथील शहीद जवानाच्या स्मारकाच्या धर्तीवरच हे दोन्ही हुतात्मा स्मारक उभारण्यात येणार आहेत. २६ जानेवारी रोजी या दोन्ही कामाचे भूमीपूजन केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.या कामासाठी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे तसेच सर्व बांधकाम समितीचे सदस्य व कार्यकारी अभियंता यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असेही त्यांनी सांगितले.
या निधीमध्ये आणखी खासदार,आमदार निधी वापरून त्याचे स्वरूप भव्य करता येईल. ते जरी नाही झाले तरी आहे त्या निधीतून चांगल्या प्रकारचे स्मारक होऊ शकते, असेही ते म्हणाले. मंजुरीचे पत्र यावेळी ग्रामस्थांना देण्यात आले. या पत्रकार परिषदेला बासलेगावचे जे. के राठोड, चनप्पा बिराजदार, लालसिंग राठोड, लखन राठोड, श्रीनिवास गवंडी, राजकुमार चव्हाण, लालसिंग चव्हाण तसेच घोळसगावचे धर्मेंद्र गायकवाड, सतीश पालापुरे, मोहन पाटील, परमेश्वर पडसलगे, अल्ताफ फकीर
परिवाराचे प्रकाश गायकवाड, सुशील फुलारी आदी उपस्थित होते.
स्मारक प्रेरणा स्थळ व्हावे
शहीद जवानांचे स्मारक म्हणजे तरुणांसाठी प्रेरक स्थान आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही गावची स्मारक निधीसाठी मागणी होती. त्यानुसार जिल्हा परिषदेत फंडातून हा निधी मंजूर केला आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न राहील – आनंद तानवडे,जि. प.सदस्य