अक्कलकोट ट्रॉमा केअर सेंटरच्या कर्मचारी भरतीचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लावू ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन
अक्कलकोट : राज्य सरकार आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्नांना सातत्याने प्राधान्य देत आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर व तालुक्यात निर्माण झालेला ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्न एका महिन्याच्या आत आपण मार्गी लावू आणि ते प्रत्यक्षात सुरू करण्याची ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून अक्कलकोट शहरात ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधून तयार आहे पण वैद्यकीय सुविधा तसेच कर्मचारी भरती अभावी हे सेंटर कोरोना काळात देखील सुरू झाले नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरत हा प्रश्न आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला व निवेदन दिले.
अक्कलकोट शहर हे तीर्थक्षेत्राचे शहर आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीला सरकारने मंजुरी दिली होती. इमारतीचे कामही मंजूर झाले आहे परंतु त्या ठिकाणी कर्मचारी भरती आणि सुविधा नाहीत ही बाब मला आत्ताच कळाली. त्यासंबंधी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक महिन्याच्या आत या ट्रामा केअर सेंटरचे सर्व कामे पूर्ण केले जातील आणि त्याच्या उद्घाटनाला मी स्वतः येईन, असेही ते म्हणाले.
राज्यात ज्या ज्या ठिकाणी इमारतीचे काम अपूर्ण आहे किंवा कर्मचारी भरतीचा प्रश्न आहे अशी कामे मी प्राधान्याने सातत्याने पूर्ण करत आहे आणि त्या कामाचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. अक्कलकोटचे काम आहे. स्वामींची सेवा म्हणून नक्की मार्गी लावेन, असेही ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष स्वामीनाथ चौगुले, युवा नेते शिवराज स्वामी, महेश माने, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विक्रांत पिसे, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, चुंगीचे राजा चव्हाण आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तालुक्याची गैरसोय दूर होणार
अक्कलकोट ट्रामा केअर सेंटर पूर्ण झाल्यास तालुक्यातील रुग्णांची मोठी अडचण गैरसोय दूर होणार आहे.हा प्रश्न कर्मचारी भरती अभावी रखडला आहे म्हणून आम्ही आरोग्यमंत्र्यांना याबाबत विनंती केली असून त्यांनीही तात्काळ लक्ष घालून हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे – दिलीप सिद्धे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस