ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची हरित भरारी! केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत ‘सोलापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन’ पुरस्कार

सोलापूर- केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय शिक्षण परिषदेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास ‘सोलापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिषदेचे चेअरमन डॉ. डब्ल्यू . जी. प्रसन्नकुमार यांनी ई-मेलद्वारे विद्यापीठ प्रशासनाला ही माहिती दिली आहे. सोलापूर विद्यापीठाने कॅम्पसमध्ये व परिसरात केलेल्या वृक्षसंवर्धनामुळे हा ‘हरित’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेमार्फत दरवर्षी स्वच्छ कॅम्पस इन्स्टिट्यूशनल पुरस्कार देण्यात येतात. याअंतर्गत जिल्हा ते केंद्रीयस्तरापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसराची ‘स्वच्छता व हरितपणा’ या मूलभूत निकषांवर निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करून प्रोत्साहित करण्यात येते. विद्यापीठाने यंदा प्रथमच यासाठी प्रस्ताव पाठविला होता. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार विद्यापीठास प्राप्त झाला आहे. प्रस्तावाच्या निकषांमध्ये सौर ऊर्जा व ऊर्जा संवर्धन उपक्रम, हरित क्षेत्र व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, भू वापर व व्यवस्थापन यांचा समावेश होता.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यापीठ कॅम्पसमध्ये तसेच विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात आणि कृषी पर्यटन केंद्रामध्ये विविध प्रकारचे हजारो वृक्ष लावण्यात आली आहेत. त्याचे योग्य संवर्धन केले जाते. त्यामुळे विद्यापीठ कॅम्पस नेहमीच हिरवाईने नटलेला दिसून येतो. हजारो वृक्षवेलीमुळे नेहमी विद्यापीठाचा परिसर निसर्ग सौंदर्याने फुलून जातो. त्यामुळे येथील वातावरण नेहमीच प्रसन्न असल्याने सर्वांनाच त्याचा फायदा होतो. पर्यावरणाचे योग्य संवर्धन होते. त्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास हा ‘ग्रीन चॅम्पियन’ पुरस्कार मिळाल्याचे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

◆ हरित विकासावर विशेष लक्ष
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून कॅम्पस परिसरात विविध प्रकारचे हजारो वृक्ष लावून त्याचे योग्य संवर्धन व संगोपन केले जाते. जल संवर्धनावरही विद्यापीठाचे विशेष लक्ष असते. दरवर्षी नव्या वृक्षांची लागवड विद्यापीठाकडून परिसरात केली जाते. विद्यापीठ कॅम्पसमधील 132 औषधी वनस्पतींची माहिती पुस्तिका विद्यापीठाकडून तयार करण्यात आली आहे. याचबरोबर कृषी पर्यटन केंद्रात ऑक्सीजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करून ऑक्सीजन पार्क तयार करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठातील सर्वजण दक्ष राहतात. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत हा पुरस्कार जाहीर झाला आहे – डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!