संतोष पाटील यांचे अधुरे स्वप्न उमेश पाटील पूर्ण करतील : कल्याणशेट्टी ; संतोष पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चपळगाव येथे विविध कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२६ : सरपंच संतोष पाटील यांची गावाबद्दल खूप तळमळ होती.परंतु त्यांच्या निधनाने विकासाची संकल्पना अधुरी राहिली.हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आता चपळगावचे सरपंच त्यांचे बंधू उमेश पाटील हे करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पाटील परिवाराने असाच पुढे चालू ठेवावा, अशी अपेक्षा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केली. सोमवारी, अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे स्व.संतोष पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरण निमित्त संतोष दादा मित्र मंडळाच्यावतीने आयोजित विविध कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड हे होते.
व्यासपीठावर जेष्ठ नेते रविकांत पाटील, सरपंच उमेश पाटील,युवा नेते बसवराज बाणेगाव, सिद्धाराम भंडारकवठे,अप्पासाहेब पाटील, अंबणप्पा भंगे, तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील, महादेव वाले, मनोज इंगुले, बसवराज मठदेवरू, कुमारप्पा पाटील, अभिजित पाटील, संजय बाणेगाव, रियाज पटेल, महिबूब तांबोळी, मल्लिनाथ सोनार, परमेश्वर वाले, पंडित पाटील, विलास कांबळे, उमेश सोनार, विष्णूवर्धन कांबळे, सुरेश सुरवसे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले, चपळगावच्या विकासासाठी संतोष पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. शेवटपर्यंत ते गावच्या विकासासाठी झटत राहिले. चपळगावच्या विकासात पाटील परिवाराचे योगदान मोठे आहे. मी लहान असताना त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायचो. आमच्या राजकीय जीवनातही त्यांचा सहभाग राहिला आहे. पाटील परिवार आणि आमचे संबंध खूप जुने आहेत पण संतोष पाटील यांच्याकडे विकासाची दृष्टी होती ते जर आज राहिले असते तर चपळगावचे चित्र आणखी पालटले असते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे बंधू उमेश पाटील यांनी गावचा विकास साधत आहेत. त्यांना सदैव सहकार्य राहील. त्यांच्या पाठीशी कल्याणशेट्टी परिवार असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बसवराज बाणेगाव यांनीही संतोष पाटील यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या गुणवैशिष्ट्ये सांगितले. राजकारण राजकारणापुरते करत सामाजिक कार्यात त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही ते माझे अतिशय जवळचे मित्र होते, असे बाणेगाव यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले. आभार महेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमास चपळगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
८२ जणांचे रक्तदान
पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त लंपी रोगावरील प्रतिबंधात्मक लस चारशे पेक्षा अधिक जनावरांना देण्यात आली.यासाठी तालुका पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य लाभले. या निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात ८२ जणांनी रक्तदान केले. या दोन्ही उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.