अक्कलकोटमध्ये ६७ तासात २ लाख २१ हजार भाविकांची नोंद
आकडेवारी तीर्थक्षेत्राचा दर्जा ठरण्यास उपयुक्त होणार, शासनाकडे जाणार अहवाल
अक्कलकोट : मारुती बावडे
राज्यात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या ही नेमकेपणाने लक्षात यावी यासाठी डिजिटल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याचा पहिला प्रयोग हा अक्कलकोटमध्ये करण्यात आला आहे.हा प्रयोग जवळपास यशस्वी झाला आहे.अक्कलकोटमध्ये मागच्या ६७ तासात २ लाख २१ हजार भाविक अक्कलकोटमध्ये आल्याची नोंद प्रशासनाकडे अधिकृतरित्या झाली आहे.
ही माहिती लवकरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे जाणार असून या आकडेवारीवरून तीर्थक्षेत्राचा दर्जा ठरणार आहे.याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी रमाकांत डाके म्हणाले की,मागच्या वीस वर्षात किंवा दहा वर्षात जी काही आकडेवारी समोर आलेली होती.ती अंदाजित स्वरूपाची होती आणि त्याद्वारे विकास आराखडा किंवा अन्य सुविधांच्या बाबतीत प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाले होते. अंदाजित आकड्यावरून सुविधा पुरवण्यात अडचणी येत होत्या.या सर्व गोष्टी मार्गी लागावेत यासाठी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या नेमकेपणाने लक्षात यावी यासाठी हे डिजिटल यंत्रणा २९ मार्च रोजी मंदिरात कार्यान्वित केली आहे.
तीस तारखेला ही दिवसभर चालली.
नंतर प्रकट दिना दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालली ती अद्यापही सुरू राहणार आहे.त्यानंतर मागच्या तीन दिवसातील फिक्स आकडा समोर येणार आहे.दि.२९ तारखेला २३ हजार ६४२,दि.३० मार्चला ४७ हजार २३३ तर दि. ३१ तारखेला प्रकट दिनी संध्याकाळी ७ पर्यंत दीड लाख भाविकांनी मंदिरात येऊन दर्शन घेतल्याची नोंद या यंत्रणेला झाली आहे. आतापर्यंत गुरुपौर्णिमा, स्वामींची पुण्यतिथी, दत्त जयंती, प्रकट दिन यासह उत्सव काळामध्ये लाखो भाविक हजेरी लावत होते. परंतु याची नेमकी आकडेवारी समोर येत नसल्याने सुविधा देण्यात यंत्रणेला अडचणी येत होत्या.बऱ्याच वेळा सुविधा अधिक असल्या की गर्दी कमी राहायची.काही वेळा गर्दी असली की कधी यंत्रणा कमी पडायची. असा प्रकार भविष्य काळामध्ये होऊ नये यासाठी कोणत्या उत्सव काळामध्ये किती गर्दी असते हे कळणे प्रशासनाला फार महत्त्वाचे आहे.त्या दृष्टीने गर्दीचे नियोजन दर्शन रांग मंदिर परिसरात असलेल्या उपलब्ध सुविधा याचे नियोजन प्रशासनाला करता येणार आहे.विशेष म्हणजे राज्यामध्ये अन्य तीर्थक्षेत्रांना ज्या पद्धतीने निधी मिळतो त्या पद्धतीने अक्कलकोटला सुद्धा यात्रा अनुदान किंवा अन्य तीर्थक्षेत्र विकास निधी हा गर्दीच्या मानाने मिळाला पाहिजे ही मुख्य भूमिका या डिजिटल यंत्रणे मागे आहे. प्रकट दिना दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ही भाविकांची मोजणी पूर्ण होईल त्यानंतर पुन्हा एकदा अंतिम आकडा हा तीन दिवसांचा समोर येईल,अशी माहिती त्यांनी दिली.
अक्कलकोटची आता मिनी शिर्डी म्हणून ओळख
आतापर्यंत पंढरपूर शिर्डी यासारख्या देवस्थान मध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत होती. परंतु आता त्या खालोखाल अक्कलकोटमध्ये गर्दी दिसून येत आहे. त्या मानाने सुविधा शासनाने दिल्यास भाविकांची संख्या आणखी वाढून तीर्थक्षेत्र विकास झपाट्याने होऊ शकतो,अशी चर्चा भाविकांमध्ये आहे.
सुविधांचे नियोजन शासनाकडून होणार
या लावलेल्या ७२ तासाच्या डिजिटल मोजणी यंत्रणेमुळे निश्चितपणे आकडा तर समोर येईलच पण या येणाऱ्या भाविकांना कोणत्या प्रकारच्या आणि कशा पद्धतीने सुविधा द्याव्या लागतील याचे नियोजन शासनाच्या पातळीवर होईल. त्या दृष्टीने हा आकडा फार महत्त्वाचा आहे.त्याची ही पहिली पायरी आहे.
रमाकांत डाके,मुख्याधिकारी