ध्यास विश्वसार्ह बातमीचा

छत्तीसगडमध्ये चकमकीत २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

कांकेर : वृत्तसंस्था

छत्तीसगडमधील हिंसाग्रस्त कांकेर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत घडलेल्या भीषण चकमकीत २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात मोठे यश आले आहे. घटनास्थळी नक्षलवाद्यांशी दोन हात करताना तीन जवान जखमी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कांकेरमध्ये येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वीच येथे नक्षल्यांसोबत चकमक घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कांकेर जिल्ह्याच्या छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिनागुंडा व कोरोनारजवळील मध्य हापाटोला गावच्या जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. या ठिकाणी उत्तर बस्तर डिव्हिजनचा नक्षलवादी शंकर, ललिता, राजू यांच्यासह इतर अनेक नक्षलवादी असल्याचे समजले. त्यानंतर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी) यांचे संयुक्त पथक कारवाईसाठी गेले. तेव्हा मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करीत नक्षलवाद्यांनी आगळीक केली. त्यास जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असता चकमकीचा प्रत्यय आला. यात २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवान यशस्वी ठरले, अशी माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.

चकमकीनंतर अतिरिक्त पोलीस व जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी ठार झालेल्या २९ नक्षलवाद्यांचे मृतदेह, एके-४७ रायफल, एसएलआर रायफल, इंसास रायफल आणि ३०३ बंदूक व मोठ्या प्रमाणावर दारूगोळा आढळला आहे. या परिसरात नक्षलवादी व पोलिसांमध्ये गोळीबार सुरू आहे. त्यामुळे लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात असल्याचे सुंदरराज म्हणाले. या चकमकीत परिस्थितीचा सामना करताना तीन जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती केले आहे. दरम्यान, सध्या कांकेरमध्ये मोठ्या प्रमाणावर बीएसएफचे जवान तैनात केले आहेत. या ताज्या चकमकीसह चालू वर्षात बस्तर क्षेत्रात घडलेल्या चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांची संख्या ७९ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!