जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३५ मुली करणार विमानाने प्रवास !
सहलीच्या माध्यमातून दिल्ली, मुंबईसह आग्राला देणार भेट
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
इच्छाशक्ती असली की सर्व काही घडते,असे म्हणतात याचा प्रत्यय अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड मुलींच्या शाळेतील सहलीवरून दिसून येत आहे. मुख्याध्यापकांच्या प्रयत्नातून ३५ मुली या विमानातून शैक्षणिक सहल करणार आहेत. सात दिवसाच्या या सहलीत त्या राजधानी दिल्ली आणि मुंबईची सफर करणार असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत.
एकीकडे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरत आहे अशी ओरड आहे मुलांना इतर गोष्टींमध्ये वाव नाही असे बोलले जात असताना दुसरीकडे पालकांच्या मनाला सुखद धक्का देणारी घटना घडली आहे.मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी आत्तापर्यंत पाच वेळा अशा प्रकारचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.यापूर्वी त्यांनी गौडगाव,जेऊर आणि नागणसूर या ठिकाणी कार्यरत असताना बेंगलोर, म्हैसूर यासारख्या प्रेक्षणीय ठिकाणी विद्यार्थ्यांची सफर घडवून त्यांना बाहेरचे जग दाखविले होते.
यावर्षी आग्रा,दिल्ली,मुंबई या तीन शहराच्या सहलीसाठी ३५ मुलींना घेऊन ते रेल्वेने रवाना झाले.पहिल्या दिवशी मुंबईमध्ये विधान भवन, लालबागचा गणपती, समुद्रकिनारा, हॉटेल ताज, गेट वे ऑफ इंडिया, हाजी अली, चैत्यभूमी यासारख्या ठिकाणांना भेटी देणार असून पहिला मुक्काम मुंबई एअरपोर्टवर राहणार आहे या ठिकाणची व्यवस्था आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली आहे.३० डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता ते मुंबईतून दिल्लीकडे विमानाने रवाना होणार आहेत.त्या ठिकाणी संसद भवन पाहणार आहेत या ठिकाणी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यवस्था केली आहे या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात दिल्ली येथील इंडिया गेट समोर कार्यक्रम करून साजरा करणार आहेत.या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ,लाल किल्ला, दिल्लीतील सरकारी शाळांना येथे भेटी देणार आहेत.त्यानंतर ते पुढे रेल्वेने आग्राकडे रवाना होणार आहेत एकूण सात दिवसाची ही सहल असून विद्यार्थ्याकडून फक्त प्रवास खर्च घेण्यात आलेला आहे काही विद्यार्थीनी पैसे दिले नाहीत काही विद्यार्थीनी कमी पैसे दिलेले आहेत तरीही पदरमोड करत मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी ही सहल यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे.या सहलीमध्ये गुरलिंगप्पा शिवणगी, शालेय शिक्षण समितीच्या रेखा सुतार,सुजाता सबसगी, विजयकुमार गुंडद सोबत आहेत.दरवर्षी शालेय उपक्रमाचा भाग म्हणून स्नेहसंमेलन, वनभोजन, परिसर भेट असे उपक्रम शाळेकडून घेतले जातात परंतु थोडे वेगळ्या पद्धतीने हा उपक्रम घ्यावा या उद्देशाने मुलींना विमानाने प्रवास घडवून आणून सहलीचा अनोखा आनंद देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.जिल्हा परिषद कन्नड मुलींच्या शाळेने घेतलेल्या या उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले आहे.
सरकारी शाळांची पाहणी करणार
दिल्ली येथील सरकारी शाळा या दर्जेदार आहेत असे सांगितले जाते त्यामुळे आम्ही या शाळांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे आणि या भेटीदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहे त्यांनी वेळ देखील दिलेली आहे या दौऱ्यामध्ये आमच्या शाळेच्या मुलींना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा योग येणार आहे अशा प्रकारची सहल घडवून आणणारी मैंदर्गी पहिलीच शाळा आहे.
– महांतेश्वर कट्टीमनी,मुख्याध्यापक