जिल्हयातील दोन पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना मिळाले प्रत्येकी ५० लाख ; पोलीस पाटील संघाच्या प्रयत्नाला यश
अक्कलकोट : जिल्ह्यातील मिरजगी (ता.अक्कलकोट) व पिंपळवाडी (ता.करमाळा ) येथील पोलीस पाटलांना अखेर राज्य शासनाकडून सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मदत मिळण्यासंदर्भात गृह विभागाकडून हालचाली सुरू होत्या. त्याला पोलीस पाटील संघाच्यावतीने दुजोरा देण्यात आला आहे. या दोन्ही गावच्या पोलीस पाटलांचा मृत्यू कोरोनाने झाला होता. मिरजगी येथील कै. शिवलिंग निंबाळ व पिंपळवाडी येथील सुवर्णा काळे यांचा सेवेत असताना कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना आता शासनाकडून प्रत्येकी ५० लाख रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळाली आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे पोलीस पाटील संघाच्या माध्यमातून भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय लावून धरून हा प्रश्न मार्गी लावला आहे. ज्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्यावेळी यावर गृहविभागाकडून तात्काळ हालचाली सुरू झाल्या. राज्य शासन निर्णय वित्त विभाग दि. २९ मे २०२१ अनव्ये लागू केलेले विमा कवच या दोघांना लागू झाले आहे. याबाबत लागणारे सर्व कागदोपत्र फाईल शासन दरबारी दाखल करण्यात आले होते.
यासंबधीचा पाठपुरावा मागील वर्षभरापासून पोलीस पाटील संघ व कुटुंबीय करीत होता. सदर पोलीस पाटीलांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यांच्या पश्चात असणाऱ्या कुटुंबियांची परवड होत होती. त्यांना तात्काळ विमा कवच रक्कम मिळणे आवश्यक होते, ते अखेर मिळाले याचे समाधान वाटते, असे जिल्हाध्यक्ष शिवानंद फुलारी यांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता.