ध्यास विश्वसार्ह बातमीचा

थकीत कर्जाच्या एकरकमी रक्कम भरल्यास 50 टक्के व्याज सवलत, इतर मागासवर्गीय महामंडळाचा निर्णय

सोलापूर : राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे थकित कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीला थकीत व्याज रकमेत 50 टक्के सलवत देण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

महामंडळाच्या कर्ज परतफेडीची मुदत संपलेले अनेक लाभार्थी असून त्यांचेकडून कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत आहेत. राज्यात मागील दोन वर्षापासून कोविड- 19 ची गंभीर परिस्थिती उद्भवली असून त्यातून काही लाभार्थीचे व्यवसाय बंद झाले आहेत तर काही व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यानुषंगाने थकीत कर्ज प्रकरणात वसुली व्हावी यासाठी संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलतीची एकरक्कमी परतावा (OTS) योजनेस संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत लागू राहणार आहे.

ओबीसी महामंडळाच्या सर्व योजनेतील थकबाकीदार लाभार्थ्यांनी योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला सात रस्ता येथील जिल्हा कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!