ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दोन महिन्यात अक्कलकोटमध्ये ४४९ रुग्ण झाले कोरोनामुक्त

अक्कलकोट : अक्कलकोट येथील शासकीय निवासी शाळेतील कोविड केअर सेंटर मध्ये मागच्या दोन महिन्यात ४४९ रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. ९ मार्च २०२१ मध्ये येथील शासकीय निवासी शाळेत कोविड केअर सेंटर सुरू झाले होते. या दोन महिन्यात येथे ७३८ बाधित दाखल झाले असुन त्यांच्यावर उपचार करून धीर देऊन त्यातील ४४९ जण हे बरे झाले आहेत.  तर ९३ बाधितांना इतर त्रास व ऑक्सिजन नसल्याने पुढील उपचारासाठी इतरत्र हलविले आहे. आता येथील कोविड केअर सेंटर व अन्नछत्र मंडळातील कोविड सेंटर मिळुन सर्व वयोगटातील १९६ बाधित उपचार घेत आहेत.

येथील इनचार्ज डॉक्टर मुळचे यवतमाळ जिल्हयातील हरषी येथील रहिवासी आहेत. डॉक्टर पत्नीचे दीड वर्षापुर्वी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सध्या त्यांना मुलबाळ नसल्याने २४ तास सेंटरमध्ये उपस्थित राहुन न घाबरता बाधितांची प्रामाणिकपणे काळजी घेत आहेत. शासनाच्या नियमानुसार उपचार करण्यात येत असुन त्यासोबतच फुफुसासाठी टेस्ट, थेरपी, रेसप्रायोमेटरी आहार, योगा स्टीम प्राऊन पोजीशन (पालथे झोपविणे)यासोबत सगळ्यांना मानसिक धीर देणे व मनोबल वाढविले जात आहे. दहा दिवस सेंटरमध्ये ठेऊन पाच दिवस घरी विलगीकरणात ठेवले जात आहे. ही जगावर पडलेली मोठी आपत्ती असुन डॉक्टर कर्मचारी स्वतःच्या कुंटुंबातील सदस्याचा विचार न करता न घाबरता उरलेले जीवनच आरोग्य सेवेसाठी अर्पण केले आहे.

कर्मचारी व त्यांचे कुंटुंबीय आजारी असातानाही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय निवासी शाळा येथील कोवीड केअर सेंटर येथे बाधितांना अंघोळीसाठी दररोज गरम व थंड पाणी, पिण्यासाठी फिल्टर केलेले कुलरचे पाणी पुरविले जात आहे.कायम स्वच्छता राखली जात असुन नाष्टा, चहा, जेवण वेळेवर दिले जात आहे.अन्नछत्र मंडळाकडून नाष्टा देत येतो.याबाबत बोलताना इनचार्ज डॉ.गजानन मारकड म्हणाले की, बाधितांना धीर देणे व कुंटुंबियाना पुर्ण परिस्थितीची जाणीव सुरूवातीला करून देणे खुप गरजेचे असते.त्यामुळे रूग्ण व नातेवाईक यांचा विश्वास वाढीस लागतो व ते उपचाराला सहकार्य करतात. पुढे काय करायचे याचा मार्ग सुकर होतो, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!