मारुती बावडे
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची ८७ टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली आहे.लॉकडाऊन उठल्यानंतर उर्वरित कामाला गती प्राप्त होणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्फत अंगणवाडी व शाळेतील बालकांची आधार नोंदणी पूर्ण करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आला.ज्या माध्यमातून जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्रचालक व अंगणवाडी सुपरवायझर यांची मीटिंग घेऊन त्यांना संपूर्ण नियोजन करून देण्यात आले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, अनौपचारीक शिक्षण ,आहार व आरोग्य विषयक शिक्षण, संदर्भसेवा, लसीकरण, बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम, माझी कन्या भाग्यश्री योजना इत्यादी उपक्रम राबवले जातात.यासाठी बालकांचे आधारकार्ड असणे आवश्यक असते म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी अक्कलकोट व त्यांच्या टीमने अक्कलकोट तालुक्यातील बालकांची शंभर टक्के आधार नोंदणी होण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू केली आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत आधार नोंदणी सुरू केले.
तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी पोस्ट ऑफिस मधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पोस्ट ऑफिसचे आधार नोंदणी मशीन गावोगावी घेऊन जाऊन आधार नोंदणीचे कॅम्प आयोजित करून आधार नोंदणी पूर्ण करून घेतली तसेच आधार नोंदणी साठी बालकाचा जन्म दाखला असणे आवश्यक असते यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून जन्मदाखले मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.परिणाम स्वरूप अक्कलकोट तालुक्यातील बालकांची ८७ टक्के आधार नोंदणी पूर्ण झालेली आहे.संचार बंदीमुळे उर्वरित कामकाज उशिर होत आहे. उर्वरित १३ टक्के बालकांची शंभर टक्के आधार नोंदणी पूर्ण करून घेण्याच्या उद्देशाने नियोजन केले जात असून लवकरच सर्व बालकांचे आधार नोंदणी केले जाईल, असे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी सांगितले.
- उर्वरित काम पण लवकरच पूर्ण होईल
लहान मुलांचे आधार नोंदणी करणे खूप जिकरीचे असते.परंतु पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात येत आहे.यामुळे इतर कामे सोपी होणार आहे.उर्वरित काम पण लवकरच पूर्ण करण्यात येईल – बालाजी अल्लडवाड,बाल विकास प्रकल्प अधिकारी,अक्कलकोट