त्या चारही चिमुकल्यांचा मृतदेह सापडले, शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश ; महसुल आणि पोलिस यंत्रणेची महत्त्वाची कामगिरी.
सोलापूर दि.३०(प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी वाहून गेलेले तीन मुली आणि एक मुलगा आज रविवारी दुपारी मृतावस्थेत सापडले. शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश मिळाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवानंद पारशेट्टी यांचा मुलगा विठ्ठल आणि मुलगी आरती तसेच सुमित्रा शिवाजी तानवडे यांची मुलगी समिक्षा आणि अर्पिता हे चौघे शनिवार दुपारी ३.३०च्या सुमारास जवळच असलेल्या भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते.पोहताना पाण्याच्या अंदाज न लागल्याने चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले,
या दुर्दैवी घटनेची माहिती गावपरिसरात वार्यासारखी पसरली. गावातील तसेच परिसरातील काही धाडसी तरुणांनी शोध कार्य चालू केले.पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रात्री उशिरापर्यत या धाडसी तरुणांच्या शोध कार्य चालूच होते. रात्रीचा वाढता अंधार आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहून रात्री उशिरा शोध कार्य थांबवले.
रविवारचा सकाळ उजडताच पुन्हा शोध कार्य सुरु झाले.
पहिल्यांदा आरतीचा मृतदेह सापडला.नंतर समिक्षा आणि अर्पिता या दोघींचा एकमेकांच्या गळ्यात पडलेले मृतदेह सापडले शेवटी दुपारी पावणे एकच्या दरम्यान विठ्ठलचा मृतदेह सापडला.
महसुल विभागाचे प्रांतधिकारी दीपक शिंदे,पोलिस अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.
मंद्रुपच्या अप्पर तहसिलदार उज्ज्वला सोरटे,सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ नितीन थेटे यांनी घटना घडल्यापासून घटनास्थळी राहून शोधमोहिम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. एनडीआर एसचे पथक आणि सादेपुरचा मानसिंग भोई या धाडसी तरुणांने या शोधमोहिमेत पुढाकार घेऊन चारही मृतदेह बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले,या शोध मोहिमेत प्रथम आरतीचा मृतदेह बाहेर काढले.काही तासानंतर एकमेकांच्या गळ्यात पडलेल्या समिक्षा आणि अर्पिता या दोघींचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसताच मानसिंगने खोल आणि प्रचंड अशा पाण्याच्या प्रवाहात जाऊन या दोघींचा मृतदेह नदीकाठावर आणले.शेवटी विठ्ठलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात तो यशस्वी ठरला. या धाडसी तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लवंगी गावातील कोवळ्या चिमुकल्या मुलामुलीवर काळाने अचानक घाला घातल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे .