सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून देशभरात काही आजाराचे रुग्ण आढळून येत असतांना आता सोमवारी राज्यातील सोलापूरमध्ये गुइलेन- बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे आणखी 9 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये 73 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यापूर्वी 26 जानेवारी रोजी सोलापुरातील 40 वर्षीय व्यक्तीचा याच जीबी सिंड्रोममुळे मृत्यू झाला होता, याला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही दुजोरा दिला होता.
सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास, खालच्या अंगात अशक्तपणा आणि जुलाब अशी लक्षणे होती. 18 जानेवारीपासून ते सतत व्हेंटिलेटरवर होते. डीन म्हणाले की, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी क्लिनिकल पोस्टमार्टम करण्यात आले. ज्यामध्ये जीबी सिंड्रोम असल्याचे कारण सांगण्यात आले होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) मध्ये रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
शहरातील विविध भागातील 34 पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी सात नमुन्यांमध्ये पाणी दूषित आढळून आले आहे. उल्लेखनीय म्हणजे 9 जानेवारी रोजी पुण्यातील रूग्णालयात दाखल झालेला रुग्ण जीबीएस पॉझिटिव्ह आढळून आला होता, ही पहिलीच घटना होती. 19 दिवसांत सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.