सोलापूर – सोलापूरच्या देवांश विजय क्षीरसागर याने आपला नववा वाढदिवस आगळ्या वेगळ्या रितीने साजरा केला. या दिवशी त्याने सोलापूर परिसरातल्या ९ पर्यटन स्थळांना भेट देणारी ६५ किलो मीटर अंतराची सायकलसफर केली. त्याने हे ६५ कि. मी. चे अंतर सहा तासात कापले. यावेळी फाउंडेशन अध्यक्ष मा.आ.सुभाष बापू देशमुख यांनी त्याचे कौतुक केले व त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या सफरीनंतर सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला आणि त्याला नवी सायकल भेट देण्यात आली. या कामी त्याला सायकलिस्ट फाउंडेशनचेही प्रोत्साहन मिळाले. देवांश क्षीरसागर हा लहान वयात अनेक विक्रम नोंदणारा साहसी बालक असून त्याने विविध मोहिमांतून आपल्या इतिहासाविषयीचा अभिमान वाढवणारे पोवाडे सादर केले आहेत. त्यातून तो पर्यावरण जागृतीचाही संदेश देत असतो. त्याने नवव्या वाढदिवसाला सोलापूरच्या पर्यटन महत्त्वाविषयी जनजागृती करायचे ठरवले आणि ९ ठिकाणांना जोडणारी सायकलसफर केली.
त्याने या सफरीत पाथरीचे इंचगिरी मठाचे सिद्धेश्वर महाराज मंदिर, बेलाटीचे संत बाळूमामा मंदिर, भय्या चौकातले कोटणीस स्मारक, सिद्धरामेश्वर मंदिर, बाळेे येथील खंडोबा मंदिर, रुपाभवानी मंदिर, मार्डीची यमाई देवी, अहिंसा गोशाळा आणि डाळीेंब संशोधन केन्द्र , पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ, या ठिकाणांना भेट दिली. सायकलिंगला प्रोत्साहन देणारे सायक्लिस्ट फाउंडेशन आणि पर्यटनाचा विकास करण्यास झटणारे सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्यातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला आणि त्याला नवी सायकल भेट देऊन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
देवांश क्षीरसागर याने अनेक स्पर्धांतून बक्षिसे मिळवली आहेत. सह्याद्रीच्या पठारावरील सर्वात दुर्गम वजीर सुळका त्याने सर केला आहे. महाराष्ट्रातले सर्वात उंच कळसुबाई शिखरही सर केले असून अनेक किल्ल्यांना भेट देऊन तिथे कार्यक्रम केले आहेत. तो अनेक जंगल सफारी आणि ट्रेकिंग मोहिमांत सहभागी झालेला आहे. त्याने वाढदिवसानिमित्त केलेल्या सायकल सफरीत त्याच्यासोबत प्रा. सारंग तारे हे सहभागी झाले होते. त्याचा सत्कार करण्यात आला तेव्हा फाऊंडेशनच्या मुख्य समन्वयक विजय पाटील, व सायक्लिस्ट फाउंडेशन चे सारंग तारे, श्री. शितल कोठारी,सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक राजकुमार मेंते , प्रा.अमोल काळे व देवांश चे वडील विजय क्षीरसागर हे उपस्थित होते.