अहमदनगर : वृत्तसंस्था
लग्न म्हटल कि समोर उभा राहतो तो थाटात पार पडणारा सोहळा, वरात, रीतीरिवाज आणि नातेवाईक मित्रमंडळी यांची मांदियाळी, त्याने या सोहळ्याला उत्सवाचे स्वरूप निर्माण होते. आणि त्यात त्या दोन्ही जीवांचे स्वप्न आकार घेऊ लागतात, जे त्यांनी पाहिलेले असतात. मात्र जर यात काही हेतुपुरस्सर गुन्हा लपलेला असेल तर संसाराची राख रांगोळी होते. आणि जर तो गुन्हा नवऱ्या मुलीने केला तर मग सांगायलाच नको. अश्याच एका स्वप्नाळू लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या नवरीला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. तिने तब्बल 9 तरुणांच्या स्वप्नांची आणि संसाराची राखरांगोळी केली आहे. सिमरन अशे त्या नवरीचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी कि, लग्नाच्या वयाचे तरुण शोधून त्यांच्याशी जवळीक निर्माण करून फसवणूक करणाऱ्या टोळीला अहमदनगरच्या श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून 2 लाख 15 हजार रुपये घेत त्याचे सिमरन गौतम पाटील हिच्याशी लग्न लावून देण्यात आले होते. लग्नाच्या दोन दिवसांनंतरच नवरीने तिच्या साथीदारासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सिमरनसह तिच्या साथीदारांना अटक केली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने 8 महिन्यांत तब्बल 9 तरुणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांना चुना लावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
मुंगुसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना अटक केली. या प्रकरणी मुंगुसगाव येथील तरुणाने 28 जून रोजी फिर्याद दिली होती. पोलिसांनी या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, असा एकूण 13 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण सात आरोपींना पकडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन हिने तिची आई आणि इतर पाच साथीदारांसह गुजरात, मध्य प्रदेश, हैदराबाद, मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठमोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केली. शाहरुख शेख फरीद, दीपक पांडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील, सचिन बलदेव राठोड ऊर्फ राज रामराव राठोड आणि युवराज जाधव अशी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींची नावे आहेत. पोलिस तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. न्यायालयाने या आरोपींना 11 दिवसांची कोठडी दिली आहे.