मुंबई : आजपासून राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा, ओबीसी आरक्षण, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे माजी गृहमंत्र्यांवरील आरोप, अनिल परब प्रकरण, जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी, ईडी, सीबीआयचे छापे, राज्यपाल – मुख्यमंत्र्यांची पत्र आणि कोरोना हाताळणी या विषायावरून सत्ताधारी आणि विरोधक थेट रणांगणांत उतरणार आहेत. विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांची पुन्हा कोंडी करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.
कोरोनाच्या सावटात आजपासून (सोमवार) दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. शक्ती कायदा, कृषी विधेयक, पुरवणी मागण्यासह कागदपत्र आणि शोक प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर आज मांडले जाणार आहेत. आधीच कमी कालावधीचे अधिवेशन असताना, दुसरीकडे दोन्ही सभागृहाच्या वेळा उशिरा ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण पुढे करत सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करत तो थेट दोन दिवसावर आणला. यातूनही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची जोरदार तयारी केली आहे. असे असताना सरकारला दोन दिवसाचे अधिवेशनही अडचणीचे ठरू नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी दोन्ही सभागृहाच्या कामकाजाच्या वेळा उशिराने ठेवल्या आहेत. विधानसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता तर परिषदेचे १२ वाजता सुरू होणार आहे.