सोलापूर,दि.१० : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभावी माध्यमाचा उपयोग करून २७ जुन ते १० जुलै व ११ जुलै ते २४ जुलै २०२१ या दोन टप्प्यात जागतिक लोकसंख्या दिन २०२१ साजरा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव म्हणाले , दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त गेली दहा वर्ष जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.यावर्षीही कोविड या आजाराने संकट असले तरीही कुटुंब नियोजनाची सेवा नियमित सुरू ठेवणे गरजेचे आहे कारण कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छुक नसलेल्या गर्भधारणा टाळणे एवढ्यापुरता मर्यादित नाही.माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.त्या अनुषंगाने ११ जुलै २०२१ हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करावयाचा आहे.
सदर लोकसंख्या दिन फक्त एक दिवस साजरा न करता दोन टप्प्यात साजरा करावयाचा आहे.पहिल्या टप्पात दांपत्य संपर्क पंधरवडा २७ जून ते १० जुलै २०२१ या कालावधीमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देण्याकरीता समाजात जनजागृती व संवेदीकरण करावयाचे आहे. तसेच दुसऱ्या टप्पात लोकसंख्या स्थिरता पंधरवडा ११ जुलै ते २४ जुलै २०२१ या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कुटुंब नियोजनाची सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या दोन्ही टप्प्यातील कार्यक्रम राबविताना कोविड हा आजार टाळण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.यावर्षी जागतिक लोकसंख्या दिनाचे घोषवाक्य “संकट काळातही करूया कुटुंब नियोजनाची तयारी ,सक्षम देश व कुटुंबाची ही आहे संपूर्ण जबाबदारी” असे आहे.
११ जुलै २०२१ च्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या पाश्वभूमीवर यावर्षी जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.यामध्ये २७ जुन ते २४ जुलै २०२१ पर्यंत दोन टप्प्यात गाव पातळीवर जागतिक लोकसंख्या दिन अतिशय प्रभावीपणे राबविला जाणार आहे.यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.