अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात हरणा नदीच्या परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
अद्यापही धरणात २०० क्यूसेकचा प्रवाह कायम आहे. दरवेळी बोरी नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी येते. यावेळी मात्र हरणा नदीच्या परिसरात मोठा पाऊस झाल्याने पहिल्यांदाच या नदीद्वारे पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. पाऊस पडण्याच्या अगोदर धरणांमध्ये १८ टक्के पाणीसाठा होता.
सध्या धरणाचा पाणीसाठा ३३ टक्क्यावर पोचला आहे.कुरनूर धरण हे तुळजापूर आणि नळदुर्ग परिसरातील पावसावर अवलंबून आहे.दरवर्षी हे धरण सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये भरत असते. यावेळी मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यातच
धरणात पाणी येण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
दोन दिवसात पंधरा टक्क्यांनी पाणी वाढले आहे. सध्या फक्त हरणा नदीतुन पाण्याचा प्रवाह सुरू आहे,असेही सांगण्यात आले. मागच्यावेळी अतिवृष्टीमुळे धरणाच्या साधन सामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याची दुरुस्ती काही प्रमाणात झाली आहे. काही प्रमाणात बाकी आहे. धरणात पाणी येण्यास सुरुवात झाल्याने ही कामे लवकर पूर्ण होणे गरजेचे आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने राहिलेली कामे तातडीने पूर्ण करून धरणाची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी नागरिकातून केली जात आहे.