पुणे,दि.१७ : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्थानिक पातळीवर होणाऱ्या राजकारणावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायण गाव बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक राजकीय चर्चांचा खरपूस समाचार घेतला.
‘लॉकडाउनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं.
राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय.ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय.दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळतंय. वयस्कर नेत्यांनं असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं.’ असं बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
“माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे.संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत.
कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे ही गोष्ट विसरू नये. महाराष्ट्राचा सरकार हे राज्याच्या हितासाठी आहे.
स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला कुणी नख लावण्याचा प्रयत्न करू नये”, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मांडलं आहे. कोल्हे यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.