ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस – अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई, दि. 29 : गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit (MTP) KIT) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तपासणीकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रशासनाने एकूण 34 ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी केली.

त्यानुसार अॅमेझॉन या संकेतस्थळावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी नोंदविली. त्यानुसार डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी दोन वेळा अॅमेझॉनवर स्वीकारून त्याची गुरुनानक इंटरप्राइजेस, लखनऊ, उत्तर प्रदेश व चौधरी फार्मास्युटिकल्स /पिरामल लि., कोरापूर, ओरिसा या संस्थेकडून औषधे पुरविण्यात आले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय MTP kit औषधाची ऑनलाईन विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन आहे. प्रशासनाने अॅमेझॉन व संबंधित वितरक यांना यासंदर्भात नोटीस बजावली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची मागणी नोंदविली असता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दोनवेळा औषधाची मागणी स्वीकारण्यात आली व ते पुरविण्यात येणार असल्याचे देखील संकेतस्थळावरुन एसएमएस संदेशद्वारे कळविण्यात आले. वास्तविक गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधांची डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस होकार दर्शविणे, हे देखिल कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याने फ्लिपकार्ट या कंपनीस नोटीस बजाविण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

नुकतेच पुणे येथे अॅमेझॉन या संकेतस्थळावरुन MTP Kit ची विक्री पुण्यातील औषध विक्रेत्यास केल्याने औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तकार दाखल केली होती. या तक्रारी अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करुन यामध्ये सामील असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे प्रत्यक्ष जावून चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुध्द पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!