सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
गणपतराव देशमुख यांच्यावर शहरातील अश्विनी रुग्णालयात पंधरा जुलै पासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री प्राणज्योत मालवली.दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय त्यांच्यासोबत होते.
तब्बल अकरा वेळा एकाच पक्षाकडून निवडणूक जिंकणारे “विक्रमवीर आमदार” असा गणपतराव देशमुख यांचा ओळख होता. सांगोला तालुक्यात त्यांनी शेती, सहकार, पाणी, स्त्री सक्षमता यांबद्दल भरीव कामगिरी केली. अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वैचारिक बैठकीशी ते एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने राज्यातील शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
सलग दहावेळा निवडून येण्याची विक्रम डिएमके पक्षाचे नेते करुणानिधी यांच्या नावावर होता. तो विक्रम भाई गणपतराव देशमुख यांनी मोडून काढला होता.
गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. या माध्यमातून लोकांना न्याय देता देता त्यांची शेतकरी कामगार पक्षाशी काम करण्याची जवळीक झाली. गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली.
२०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.गणपतराव देशमुख हे एक तत्वनिष्ठ व आदर्श राजकारणी होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक ज्येष्ठ अनुभवी नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.