---Advertisement---

पूरग्रस्त भागातून वीज बिल माफीची मागणी; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली “ही” प्रतिक्रिया

Follow Us:
---Advertisement---

सांगली : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगलीत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे पुरबाधित भागातील नागरिकांना विजबिलापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत पूरबाधित ग्राहकांना वीज बिल भरावं लागणार नाही, अशी घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी सांगलीत केली.ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शुक्रवारी सांगलीच्या दौऱ्यावर होते.

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील नऊ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी सात लाख ८७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू केल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.

सांगली शहरासह अंकलखोप, भिलवडी येथील पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. तसंच पुरामुळे महावितरणच्या झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पूरबाधित भागात गेल्यानंतर अनेक ठिकाणी वीज बिल माफीबाबत विचारणा केली जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र ऊर्जामंत्री असलो तरीही वीज बिल माफीचा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. हा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळाचा आहे. मंत्रिमंडळ याबाबत लवकरच निर्णय घेईल. तुर्तास पूरग्रस्त भागात वीज बिलांची वसुली न करण्याचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुरामुळे सांगली जिल्ह्यात ऊर्जा विभागाचे ३४ कोटी ६८ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. यात सात सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर, वीज मीटर यासह विविध उपकरणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १७ सबस्टेशन्स पुराने बाधित झाली आहेत. ६७ हजार ग्राहकांना पुराचा फटका बसला. अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात नऊ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. आतापर्यंत यातील सात लाख ८७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे. पूरबाधित क्षेत्रात तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मंत्री राऊत यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!