अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घातले असून खाजगी दवाखाने हाऊसफुल झाले आहेत. याकडे सरकारी आरोग्य यंत्रणेने आता अधिक लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. डेंग्यूसदृश आजाराचे शेकडो रुग्ण तालुक्यात पाहायला मिळत आहेत. सहसा पावसाळ्यामध्ये या आजाराचा सामना नागरिकांना अधिक करावा लागतो. यावर्षी देखील सर्दी, ताप, खोकला, प्लेटलेट कमी होणे, थंडी वाजणे, सतत ताप येणे, अंगदुखी, शरीरातील पाणी कमी होणे अशा प्रकारच्या लक्षणाचे रुग्ण हे प्रत्येक गावात आढळत आहेत.
अक्कलकोट शहरात तर प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारचे रुग्ण आढळत आहेत. काही ठिकाणी तर एकेका घरामध्ये चार ते पाच जणांना याची लागण होत आहे. ही साथ आहे की काय ? अशा प्रकारची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. सरकारी यंत्रणेकडे याची फारशी नोंद होत नसली तरी खाजगी दवाखाने मात्र जाईल तिथे फुल्ल दिसत आहेत.
याबाबत सरकारी यंत्रणेला विचारले असतात आमच्याकडे याची नोंद नाही, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र दवाखान्यात चित्र पाहिले तर मात्र जाईल त्या ठिकाणी सर्दी, ताप, खोकला याचे रुग्ण वाढले आहेत. हे नाकारून चालणार नाही. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांना विचारला असता ते म्हणाले की, आम्ही तालुक्यात नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी एक दिवस घरातील सर्व साठवणुकीचे भांडे खुली करून एक दिवस कोरडा दिवस पाळून डेंग्यु सदृश्य आजाराशी दोन हात करावे, याबाबत आरोग्य यंत्रणा दक्ष असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राना याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामार्फत कार्यवाही सुरू आहे. ज्यांना कोणाला अशा प्रकारची लक्षणे असतील त्यांनी संबंधित विभागाला संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जनजागृती अन प्रत्यक्ष कृती हवी
“अक्कलकोट शहरात याचे प्रमाण मोठे दिसत असून नगरपालिकेने यासंदर्भात ठोस उपाय योजना करून ही साथ रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी एक मागणी आहे. ग्रामीण भागामध्ये ही सरकारी आरोग्य यंत्रणेने याबाबत दक्ष राहून ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकातून होऊ लागली आहे.”