सोलापूर – प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीच्या माध्यमातून राष्ट्रीय तथा वैद्यकीय आपत्तीच्या काळात संकटग्रस्तांना मदत केली जाते. प्रधानमंत्री राहत कोषच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आतापर्यंत १. २५ कोटी रूपयांहून अधिकची आर्थिक सहायता मदत करण्यात आली आहे. या मदतीमुळे गोरगरीब रुग्णांवर वेळेत उपचार झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याची माहिती खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली.
प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीच्या माध्यमातून आरोग्य तसेच राष्ट्रीय आपत्ती काळात विविध सामाजिक कामांसाठी आर्थिक मदत केली जाते. सन २०१९ पासून ते आजपर्यंत सुमारे ९० जणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. किमान ५० हजार ते ५ लाखांहून अधिक पर्यंतची मदत याद्वारे दिली आहे. कॅन्सर, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, हृदयरोग, आदी महत्वाच्या उपचारासाठी हि मदत केली जाते. आर्थिक संकटात असलेल्यांना या मदतीने वेळेत उपचार घेणे शक्य होते.
याकामी गरजूंची कागदपत्रे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी कार्यालयास पाठविल्यानंतर पुढील ९० दिवसांमध्ये पात्र यादी ठरते. त्यानंतर कार्यवाही होऊन हि मदत संबंधित रुग्णांच्या नावे रुग्णालयास प्राप्त होते. अद्याप ८० हुन अधिक पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्येण्यासाठी कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना मदत केली जात आहे. काही उपचार किचकट वा अत्यंत खर्चिक असल्याने सामान्यांना उपचार घेणे शक्य होत नाही. परंतु या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब, अबालवृद्धांना जास्तीत जास्त मदत दिल्याने मोठ्या संकटातून आधार मिळाला.