ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघाले आहेत.” : नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आज गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. तेथून त्यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. आज १९ ऑगस्टपासून सुरू झालेली ही जनआशीर्वाद यात्रा मुंबईतील विविध विभागांत २१ ऑगस्टपर्यंत काढली जाणार आहे. त्यानंतर पुढे कोकणात ही यात्रा जाणार आहे. यावेळी संभोधित करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी राणेंसोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे, तृप्ती सावंत उपस्थित होत्या.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत. आपल्याला आपलं राज्य वाचवाचयं, पुन्हा भाजपचं सरकार आणायचंय, राज्य उद्धवस्त करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचायचंय”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आजपासून नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. मुंबईतल्या पहिल्या भाषणात त्यांनी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला.

देवेंद्र फडणवीसांनी मला दिल्लीला पाठवलं. मी केंद्रीय मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू- उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्राचे नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!