अक्कलकोट शहरासह तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये फक्त महिलांना कोरोना लस, रक्षाबंधन सणानिमित्त राबविला उपक्रम
अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट शहरात रक्षाबंधन सणानिमित्त ग्रामीण रुग्णालय मध्ये खास महिलांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यात अडीचशे महिलांनी कोरोना लस घेतली आणि प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमाचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड यांच्या हस्ते सकाळी रुग्णालयात करण्यात आला.
रक्षाबंधन सणा निमित्त जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास तालुक्यात देखील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला. त्याचे नियोजन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी केले होते.
अक्कलकोट शहरात ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी या संदर्भात आवाहन केले होते. त्यानुसार सकाळपासूनच ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर महिलांनी गर्दी केली होती. लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची भीती कमी आहे. जरी कोरोना झाला तरी जीवाला धोका कमी आहे.
पूर्वी पासून महिलांमध्ये लसीची भीती थोडी जास्त होती. त्यामुळे खासकरून महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी प्रशासनाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात १८ वर्षापुढील महिलांचा सहभाग होता, असे डॉ.राठोड यांनी सांगितले.