ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये तारामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाला अखेर प्रारंभ, पालिकेकडून १ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर

अक्कलकोट  : अक्कलकोट शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या कारंजा चौकातील तारामाता उद्यानाच्या सुशोभीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. या कामासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून १ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून लॉन, झाडे पाण्याची टाकी, वॉल कंपाऊंड यासह सुशोभीकरणाची कामे होणार आहेत.  तसेच या निधीतून अन्य बागेत, स्मशानभूमीत व मोकळ्या जागेत आठ हजार झाडांचे वृक्षारोपण होणार आहे.

यासाठी नगराध्यक्षा शोभा खेडगी व अन्य पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन कामाची सुरुवात झाली आहे.  या बागेला ऐतिहासिक वारसा असून या ठिकाणी एक दुर्मिळ कारंजा आहे.  त्या कारंजामुळे ही बाग जगप्रसिद्ध आहे. आता पालिकेने सुरू केलेल्या या सुशोभीकरणामुळे ही बाग चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकेल.

अक्कलकोट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही बाग असल्याने नागरिकांना याचा चांगला फायदा होणार आहे.अक्कलकोट शहरात अनेक उद्याने आहेत त्यापैकी अतिशय महत्वाचे उद्यान म्हणून याकडे पाहिले जाते. याच्या सुशोभीकरणाचा मुद्दा अनेक वेळा विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी छेडला होता. त्याला अखेर चांगला आणि मोठा निधी उपलब्ध झाल्याने हे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण होईल आणि या कामाची जबाबदारी तिरुपती कन्स्ट्रक्शनला देण्यात आल्याची माहिती नगरसेवक बसलींगप्पा खेडगी यांनी दिली.

हे काम दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी आमची टीम काम करत असून त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडेल, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!