समाजाचे कल्याण हाच वीरशैव सिद्धांत : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी;लोकाभिमुख प्रशासन प्रमुख सन्मानपत्र आणि महात्मा बसवेश्वर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण
सोलापूर,दि.५ : प्रतिनिधी
निस्वार्थ भावनेने समाजाचे कल्याण करण्याचा मार्ग महात्मा बसवेश्वरांनी जगाला दाखवून दिला आहे. हाच खरा वीरशैव सिद्धांत आहे. हा सिद्धांत समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत ,असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य वीरशैव शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी मंडळातर्फे रविवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना लोकाभिमुख प्रशासन प्रमुख सन्मानपत्र आणि सामाजिक कार्यकर्ते सुदीप चाकोते यांना महात्मा बसवेश्वर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आजीव सभासद प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले. फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, सुदीप चाकोते, शिवसेनेचे शहरप्रमुख आणि नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल हत्तुरे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, मंडळाचे अध्यक्ष शिवानंद भरले, सचिव बसवराज दिंडोरे, उपाध्यक्ष काशिनाथ घोंगडे, कोषाध्यक्ष अनिल बिराजदार, सूर्यकांत हत्तुरे, उपस्थित होते.
यावेळी लोकाभिमुख प्रशासन प्रमुख सन्मानपत्र देऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा तर महात्मा बसवेश्वर जीवन गौरव पुरस्कार देऊन सुदीप चाकोते यांचा सत्कार करण्यात आला. फेटा, पुष्पकार, शाल, सन्मानपत्र, महात्मा बसवेश्वरांची मूर्ती असे या सत्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना सीईओ स्वामी म्हणाले, आपल्या हातून चांगले कार्य होत राहणे ही परमेश्वराची इच्छा असते. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता सत्कर्म केल्याचे समाधान वेगळेच असते. महाराष्ट्र राज्य वीरशैव शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी मंडळाने समाजातील क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय, उद्योग, व्यवसाय अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या तरूणांच्या पाठीशी उभे रहावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे. तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, क्रीडा विषयक तसेच व्यवसाय मार्गदर्शन करावे अशी अपेक्षाही श्री. स्वामी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी जि.प. सदस्य उमेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, सामाजिक कार्यकर्ते सुदीप चाकोते यांनीही मनोगत व्यक्त केले. नागेश साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रास्ताविक तर सिद्धेश्वर दसाडे यांनी आभार प्रदर्शन केले.
जीवनगौरव पुरस्काराने यांचाही झाला सन्मान ..
गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, एपीआय शरणप्पा मनगाणे, नायब तहसीलदार सुनिल मुनाळे, समीर कुंभार, गुरूसिद्धय्या हिरेमठ, शिक्षिका अंजली शिरसी, शिक्षक सुहास उरवणे, सुनिल डिगोळे, महेश शेंडे, ग्रामसेविका मेघा दारफळे, अशोक बिराजदार, मिलिंद स्वामी, ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब गंचिनगोटे, प्रा. कल्लप्पा बिराजदार, गौरीशंकर स्वामी.