तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.५ : शिक्षकांमुळे समाज घडत असतो हे जरी खरे असले तरी चांगल्या शिक्षकांमुळे शाळेचा लौकिक देखील वाढतो त्यामुळे प्रतिष्ठा आणि सन्मान वाढतो, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे अध्यक्ष शिरीष पंडित यांनी केले.अक्कलकोट येथील लायन्स क्लबच्यावतीने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना पंडित म्हणाले की, चांगल्या शिक्षकांमुळे चांगले विद्यार्थी घडतात आणि तेच विद्यार्थी पुढे देशाचे चांगले नागरिक बनतात. चांगले नागरिक बनविण्याचे काम शिक्षकाच्या हातूनच होत असते त्यामुळे त्यांचे कार्य अमूल्य आहे याची आम्हाला जाणीव आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात तेवीस शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.यावर्षी कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.शाळेतील तेवीस शिक्षकांना गुलाबाची रोपे भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष शिरीष पंडित,ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र हत्ते,सचिव विठ्ठल तेली,डॉ.प्रदीप घिवारे,प्रभाकर मजगे, सुभाष गडसिंग,सुभाष खमीतकर,संतोष जिरोळे,मुख्याध्यापिका खुने,निलगार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बिराजदार यांनी केले तर आभार खमीतकर यांनी मानले.