सोलापूर, दि.१८: सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज नियोजन भवन येथे विभागांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा पुरवठा अधिकारी कारंडे आदी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन डॉ. कदम म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे शासनाचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून द्या. कृषी योजनांचा प्रसार करून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. खतांची कमतरता भासणार नाही, याकडे लक्ष द्यावे. खत आणि बियाणे विक्री केंद्रावर तपासणी करून गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ९९ टक्के शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. खरीप पीक कर्ज वाटप ९८ टक्के केल्याने सहकार विभागाचे डॉ कदम यांनी कौतुक केले. यावेळी सहकारी संस्था, लेखा परीक्षण याचाही आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात २९ शिवभोजन थाळी केंद्रातून सुमारे १० लाख ३२ हजार ९९४ गरजू नागरिकांनी थाळीचा लाभ घेतला आहे. या केंद्रांची तपासणी करा, नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जात पडताळणीचे दाखले त्वरित द्या
सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतीगृहाचा त्यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांना वसतिगृहात चांगले जेवण आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जात पडताळणी समितीतर्फे देण्यात येणारे दाखले गरजूंना त्वरित उपलब्ध करून द्या. प्रलंबित जातपडताळणीची प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनाही डॉ कदम यांनी दिल्या.