अक्कलकोट,दि.२१ :अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावरील कुंभारी व वळसंग या दोन ठिकाणी टोलवसुली चालू आहे. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसताना प्रशासनाने टोल वसुलीसाठी कोणत्या आधारावर परवानगी दिली आहे. एकप्रकारे प्रशासनाचा मनमानी कारभार चालू आहे. या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी दिला आहे.
अक्कलकोट ते सोलापूर या दरम्यान दोन तीन उड्डाणपुलाचे काम व रस्त्याचे काम अर्धवट असताना टोलवसुली चालू केली आहे. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून शासनाच्या नियमानुसार रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच टोलवसुली करण्यात यावी या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे.
एक तर या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने गेल्या दोन तीन वर्षात कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्याच्या कडेला पुलावर कठडे नसल्याने कित्येक चारचाकी वाहने रस्त्यावरुन पन्नास ते साठ फुट खाली पडल्याने कित्येक अपघात झाले आहेत.
तरी या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली बंद करण्याचे आदेश देण्यात यावे. अन्यथा येत्या आठ दिवसांत राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दोन्ही टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती बंडगर यांनी दिली आहे.