अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हिळळी ते शावळ रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभाग कधी लक्ष देणार,असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे.
या रस्त्यावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्याची वाट लागली आहे. तसेच ज्यावेळी पावसाळा असतो पाऊस पडतो त्यावेळेस गुडघाभर पाण्यातून हा रस्ता जातो. छोटी वाहने पाण्यातून जात असताना पलटी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. हा रस्ता खराब झाल्याने अक्कलकोटहुन येणारी बस सुद्धा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ते होण्याआधी हा रस्ता दुरुस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
हा रस्ता देखील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असल्याने अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, आम्हाला कोणी वाली आहे की नाही, असा सवाल सरपंच आप्पाशा शटगार यांनी विचारला आहे. हिळळी गाव शंभर टक्के बागायत असल्याने ऊस वाहतूक कशी करायची, हातातोंडाशी आलेला ऊस व इतर पीके कसे शहरापर्यंत पोचवायचे अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
यासाठी ग्रामस्थ कंटाळले असून याबाबतीत आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व होण्याआधी हा रस्ता दुरुस्त करून दोन्ही गावच्या ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी समोर येत आहे.