काँग्रेसच्या कठीण काळात सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी पक्षाला उभारी दिली : शिंदे; म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी दुधनीत विविध कार्यक्रम
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२ : लोकनेते स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे हे काँग्रेसचे आधारवड नेते होते. त्यांना एक वैचारिक भूमिका होती त्यामुळेच ते शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणासह सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातही त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
शनिवारी,अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे लोकनेते स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हेत्रे मळा येथे आयोजित स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे व मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्रीशैल पिठाचे जगदगुरू श्री.श्री.श्री.१००८ डॉ. चन्नसिद्धाराम पंडितांराध्याय शिवाचार्य महास्वामीजीं यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील हे होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,१९७० चाली माझा आणि त्यांचा परिचय प्रचाराच्या निमित्ताने झाला.स्वर्गीय नामदेवराव जगताप आणि एस.आर दमानी यांच्यासोबत त्यांची आणि माझी भेट झाली. साधी राहणी आणि त्यांचे उच्च विचार मला देखील त्यावेळी भावले. नेतृत्वाने ते फार कोमल होते. प्रसंग पाहून ते निर्णय घ्यायचे. म्हणून त्यांना इतका जनाधार लाभला. दुधनी आणि आसपासच्या परिसरात सर्व समाजातील तंटे मिटवत त्यांनी लोकसंग्रह केला.त्यांची छाप केवळ महाराष्ट्रावर नव्हती तर कर्नाटकातील गुलबर्गा, विजापूर या भागातील राजकारणावर देखील होते. ते एक काँग्रेसचे प्रखर निष्ठावंत नेते होते. आयुष्यभर त्यांनी काँग्रेस शिवाय दुसरे काही केले नाही, असे सांगून अडचणीच्या काळात अनेक जण पक्ष सोडून गेले पण ते ताठ मानेने काँग्रेस पक्षाबरोबर उभे राहिले, याचा अभिमान वाटतो,असेही ते म्हणाले.
दुधनी बाजार समिती असो किंवा नगरपालिकांची निवडणूक ते नेहमी जिंकून पक्षाचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करायचे. अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांचा मोठा दबदबा असल्याने आम्ही नेहमी या भागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवून निश्चित असायचो. स्वर्गीय बी.टी माने आमदार असताना देखील कठीण प्रसंग होता. त्यावेळी देखील त्यांची साथ खूप मोलाची ठरली होती. तत्त्वाला सोडून ते कुठे गेले नाहीत. आज देखील सिद्धाराम म्हेत्रे अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहेत पण तेही डगमगले नाहीत, असे त्यांनी सांगितले. महास्वामींचा उल्लेख करून ते म्हणाले की, राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्याशी नेहमी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज धार्मिक सत्तेबरोबर सामाजिकरणाची शक्ती सोबत असली पाहिजे तरच येणारा काळ चांगला ठरू शकतो, असेही ते म्हणाले.
प्रारंभी स्व.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या जीवनावर आधारित “दणीवरियद धिमंत” या कन्नड पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अफझलपुरचे माजी आमदार मालिकय्या गुत्तेदार,आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी मंचावर ष.ब्र.डॉ. गंगाधर शिवाचार्य अब्बेतुमकुर, म.नि.प्र.डॉ.चन्नमल्लेश्वर शिवाचार्य बडदाळ, ष.ब्र.हवा मल्लीनाथ महाराज भिगवण, म.नि.प्र.महांतेश्वर महास्वामीजी मैंदर्गी,ष.ब्र. जयगुरूशांतलिंगाराध्य शिवाचार्य हिरेजेवर्गी, डॉ. इनामदार गुरुवर्य मनगुळी, श्री संतपुरुष शिवाजी महाराज तन्हाळीमठ पंढरपूर,ष.ब्र. डॉ. मल्लीकार्जुन शिवाचार्य होटगी, ष.ब्र.डॉ.मृगराजेंद्र महास्वामीजी जिडगा, ष.ब्र.डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी दुधनी, म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी अक्कलकोट, म.नि.प्र.अभिनव बसवलिंग महास्वामीजी नागणसुर, ष.ब्र.रेणूका शिवाचार्य मंद्रुप,ष.ब्र.मळेंद्र शिवाचार्य हिरेमठ अफजलपूर, म.नि. प्र.अभिनव शिवलिंगेश्वर मादन हिप्परगा इत्यादी महास्वामींजींच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन आणि महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री,स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे आणि लक्ष्मीबाई म्हेत्रे यांचे प्रतिमा पुजन करून करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते तालुक्यात कोरणा काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोव्हिडं योध्याचा देखील स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आळंदचे माजी आमदार बी.आर.पाटील, अफझलपुरचे आमदार एम.वाय.पाटील,आमदार संजय शिंदे, सुदीप चाकोते, आळंदचे आमदार सुभाष गुत्तेदार, बाळासाहेब शेळके, श्रीशैल नरोळे, केदार उंबरजे, जेष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप सिद्धे, नगरसेवक चेतन नरोटे, पंचायत समिती सभापती आनंद सोनकांबळे, अशपक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील, महेश इंगळे, आनंद तानवडे, अमोलराजे भोसले, गुरुशांत ढंगे, धनेश अचलारे, उपसभापती प्रकाश हिप्परगी, शीतल म्हेत्रे, लक्ष्मी म्हेत्रे, डॉ.सुवर्णा मलगोंडा, शांभवी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली म्हेत्रे, नगरसेवक नसरोद्दीन मुतवल्ली, डॉ.ऐश्वर्या म्हेत्रे, डॉ.शांभवी म्हेत्रे, बालाजी म्हेत्रे, अरुण जाधव, मंगल पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजयश्री हिरेमठ व विद्याधर पुजारी यांनी केले तर प्रास्ताविक शैलशिल्पा जाधव यांनी केले. आभार प्रथमेश म्हेत्रे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक डॉ.उदयकुमार म्हेत्रे, दुधनी अडत व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, उपाध्यक्ष राजशेखर दोशी, स्वामींनाथ स्थावरमठ, शिवानंद माड्याळ, शिवानंद हौदे, चंद्रकांत म्हेत्रे, रामचंद्र गद्दी, शंकर भांजी, लक्ष्मीपुत्र हबशी, गुरूशांत हबशी, शरणगौडा पाटील,अप्पू माळगे, काशिनाथ गोळळे यांनी परिश्रम घेतले.
★ सिद्धारामजी लढते रहो…
पराभव येतात आणि निघून जातात, असे म्हणत शिंदे यांनी म्हेत्रे यांना मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगत पराभवातून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले. एवढी गर्दी आणि वर्दळ पाहता निश्चितच आपल्याला पुन्हा उभारी मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी आपल्या भाषणातदरम्यान व्यक्त केला.
★ सुरेख नियोजन आणि उत्तम व्यवस्था
यासाठी स्वतंत्र समित्या गठित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानच्या प्रा.धनराज भुजबळ यांनी दोनशे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आलेल्या सर्वांचे टाळ्यांनी स्वागत करण्याबरोबरच कार्यक्रमात शिस्त आणण्यासाठी प्रयत्न केले.यामुळे कार्यक्रम उत्कृष्ट झाल्याची
चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
★ हजारो कार्यकर्त्यांनी घेतला खिरीचा आस्वाद
यावेळी कार्यक्रमास येणाऱ्यांसाठी खास खिर, भात आणि आमटी मेनू ठेवण्यात आला होता. उपस्थितांनीं याचा मनसोक्त आस्वाद घेतला.प्रसाद तयार करण्यासाठी दुधनी सिद्धरामेश्वर देवस्थानचे चेअरमन चंद्रकांत येगदी, बसवण्णप्पा धल्लू, सिद्धाराम येगदी, शिवशरणप्पा हबशी, सातलिंगप्पा परमशेट्टी,शिवप्पा सावळसूर
यांच्यासह दुधनीतील सर्व समाजाचे प्रतिष्ठित व्यक्तींनी यांसाठी परिश्रम घेतले.
★ दुधनीत लोटला जनसागर
स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे हे तालुक्यात
भीष्म पितामह म्हणून ओळखले जायचे. तालुक्याच्या प्रत्येक गावात त्यांचा चाहता वर्ग होता .त्यामुळे प्रथम पुण्यतिथी दिनी दुधनीमध्ये अक्षर:शा जनसागर लोटला होता. प्रत्येकांनी त्यांच्या स्मृती स्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.