ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई -हैद्राबाद नियोजित बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल केल्यास तीव्र आंदोलन – श्रीकांत देशमुख

सोलापूर (प्रतिनिधी): मुंबई-हैद्राबाद या सोलापुरातून जाणाऱ्या नियोजित बुलेट ट्रेनचा मार्ग मराठवाड्यातून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा मार्ग बदलण्यासाठी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची ढाल करून राष्ट्रवादी काँग्रेस पडद्यामागील भूमिका चोख बजावत आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने जाणीवपूर्वक सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांना आडकाठी आणून विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात भर घालणार्‍या मुंबई -हैद्राबाद या नियोजित बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल केल्यास भाजप संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून सोलापूर जिल्ह्यावर सातत्याने अन्याय होताना दिसत आहे. मध्यंतरी उजनीचे पाणी इंदापूर-बारामतीला नेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजपच्या आमदार आणि खासदारांनी आवाज उठवल्यानंतर हा निर्णय सरकारला रद्द करावा लागला. मुंबई-हैद्राबाद या सोलापुरातून जाणाऱ्या नियोजित बुलेट ट्रेनचा मार्ग मराठवाड्यातून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुलेट ट्रेनचा मार्ग मराठवाड्यातून नेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही तसे पत्र केंद्राला पाठवले आहे. सदरचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा आशयाचे पत्रच का दिले? हा संशोधनाचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून राज्यातील सर्वच जिल्हे व विभाग सारखेच असतात. मात्र, सदरचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दबावाखाली दिले असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे शिवसेना ही सोयसेना झाली असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट ही महत्वाची तीर्थक्षेत्रे असून सोलापूर शहर टेक्सटाईल हब बनू पाहत आहे. सातारा व पुणे जिल्हा औद्योगिक व पर्यटनस्थळांचे जिल्हे म्हणून नावारूपाला आले आहेत. देश-परदेशातून येणारे व्यापारी, पर्यटक, भाविक यांच्यासाठी या बुलेट ट्रेनचा मार्ग अतिसुलभ ठरणार आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील बांधकाम मंत्री असताना अर्थसंकल्पात मंजूर झालेले सोलापूर जिल्ह्यातील राज्यमार्गाचे रस्ते व निधीसुद्धा अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यात पळवून नेला आहे. ही बाब ताजी असताना अशोक चव्हाण यांनी मुंबई -हैद्राबाद नियोजित बुलेट मराठवाड्यातून नेण्याचा घाट घातला आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस बळ देत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर दबाव न टाकता विकासाचा समतोल असाच राहू द्यावा. अन्यथ मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा लढा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली उभा करावा लागेल असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिला आहे.

मोदी सरकारने मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी दिला आहे. हा मार्ग पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून पुढे कर्नाटकातून आंध्रप्रदेशातील हैद्राबाद या मेट्रोसिटीपर्यंत जोडण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. अंतराच्या आणि आर्थिक बचतीच्या दृष्टीने हा मार्ग परवडणारा आहे. त्यामुळे या मार्गाचा सर्व्हे देखील पूर्ण झाला आहे. हा मार्ग अंतिम टप्प्यात आलेला असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा मार्ग मराठवाड्यातून नेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. सोलापुरात भाजपाची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीचे केवळ चार आमदार असल्यामुळे सातत्याने जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे. राज्य सरकार जर या नियोजीत मार्गात बदल करणार असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध राहणार आहे. वेळप्रसंगी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांना घेऊन विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नियोजित मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेनचा मार्ग पुणे, सातारा, सोलापूर असाच राहण्यासाठी पत्र देणार असल्याचे श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे पत्र व्हायरल झाल्यानंतर खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व खा.शिवाचार्य महास्वामी यांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी खासदारांसमवेत बैठक घेऊन त्यात भूसंपादनाचे काम दोन वर्षात सुरू होईल तर संपूर्ण काम दहा वर्षात पूर्ण होईल असे सांगितले. यावेळी बुलेट ट्रेनचे अधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारने वरील बैठकीचा स्टंट करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका श्रीकांतदादा देशमुख यांनी केली. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मंजूर मार्ग आहे असाच ठेवून अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यासाठी स्वतंत्र बुलेट ट्रेनची मागणी करावी असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!