ध्यास विश्वसार्ह बातमीचा

घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना स्वामीं दर्शनाचा मार्ग मोकळा; अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते मंदीराचं द्वार उघडून भाविकांच्या स्वामी दर्शनास प्रारंभ

अक्कलकोट दि. ७ ऑक्टोबर – कोरोना संसर्गाची दुसरी लाट व लॉकडाऊनमुळे गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील मंदीरे महाराष्ट्र शासनाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी समर्थांचे मंदीरही आजपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना दर्शनाकरीता उघडण्यात आले.

पहाटे ४:४५ वाजता मंदीरातील अपंग सेवेकरी संतोष सलगरे यांच्या हस्ते व चेअरमन महेश इंगळे तसेच फलटण येथील निस्सीम स्वामी भक्त अतुल कापडी व कुटूंबियांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांसाठी मंदीराचे द्वार उघडून पहाटे ५ वाजता सदर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरोहीत मंदार पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती संपन्न झाली. गेल्या साडे सहा महिन्यांपासून स्वामींच्या दर्शनासाठी आतुर असलेले भाविक आज पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने व श्रध्देय भक्ती भावाने उपस्थित होते. स्वामींचे राज्यभरात लाखो भक्त आहेत. जवळपास साडे सहा महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळं भाविकांच्या नयनात स्वामी भक्तीच्या उत्सुकतेचं चित्र इथं पाहायला मिळालं. मंदिर उघडण्यात आल्यावर स्थानिक नागरिकांसह अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी स्वामींचं दर्शन घेत समाधान आणि आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी बोलताना मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी त्याचा प्रादूर्भाव आद्याप पुर्णपणे ओसरला नाही. या पार्श्वभुमीवर मंदीर उघडण्याकरीता प्रशासनाने मार्गदर्शीत केलेल्या नियमावलीनुसार एका तासात अंदाजे १०० भाविक दर्शन घेवून सुखरूप बाहेर निघतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अक्कलकोट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अमर पाटील यांनी मास्क व सॅनिटायझर थर्मल स्कॅनर मंदिर समितीस उपलब्ध करून दिले आहेत. भाविकांच्या सोईकरीता मंदीर समितीच्या वतीने मंदीरातील परिसरात विविध ठिकाणी सॅनिटायझरची सोय केली आहे. भाविकांना मंदीरात प्रवेश करत असताना आपापल्या मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत या प्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आजपासून नियमीतपणे कोरोना विषयी जनजागृती म्हणून मंदिर समितीद्वारे वेळोवेळी शासनाच्या कोरोना बद्दलच्या गाईडलाईन्सचे अनाउन्समेंट करण्यात येईल. अशा पद्धतीने भाविकांची दर्शन घेण्याची सोय केल्यास निश्चितच कोरोना संसर्ग पसरणार नाही अशी आशा व्यक्त करून मंदिर उघडल्यानंतर येणाऱ्या भाविकांनीही मंदिर समितीच्या व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून स्वामींचे दर्शन घेऊन सुखरूप रित्या माघारी जावे असे आव्हानही महेश इंगळे यांनी याप्रसंगी केले आहे. या प्रसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, सविता कापडी, यश कापडी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, संतोष पराणे, प्रसाद सोनार, सिध्दू कुंभार, विपूल जाधव, संतोष जमगे, ज्ञानेश्वर भोसले, गिरीश पवार, सचिन पेठकर, संदीप दुधनीकर, अमर पाटील, प्रसन्न हत्ते, रामचंद्र समाणे, अरूण चव्हाण, गणेश इंगळे, नागनाथ गुंजले, चंद्रकांत कवटगी, महेश मस्कले व इंगळे कुटूंबीयांसह अनेक भाविक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!