अक्कलकोट, दि.७ : सप्टेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे अक्कलकोट तालुक्यात उद्यापासून करण्यात येणार आहेत. यासाठी किणी मंडळात हे पंचनामे शुक्रवारपासून सुरू होतील, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिली.
शासनाच्या नियमानुसार ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या मंडळांमध्ये हा सर्व्हे केला जाणार आहे. त्यात किणी मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये किणी, काझीकणबस, किणीवाडी, कुरनूर ,बसवगीर, मोट्याळ,सिंदखेड, बोरगाव दे, पालापुर, घोळसगाव,किरनळळी, चुंगी, सुलतानपूर या तेरा गावांचा समावेश करण्यात आला आहे.
यासाठी पर्यवेक्षक कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली असून हा पंचनामा चार ते पाच दिवस चालणार आहे. त्यानंतर हा अहवाल तहसीलला सादर होणार आहे. यानंतर अंतिम प्रस्ताव तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे, अशी माहिती शिरसट यांनी दिली.
मागच्या एक महिन्यापासून या भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून लाखो रुपयांचे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण
पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांतून होत होती. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.