अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात आज अतिशय शांततेत आणि भक्तीमय वातावरणात उत्साहात ९८ नवरात्र मंडळाने देवीची प्रतिष्ठापणा केली. यानिमित्त ग्रामीण भागामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. परंतु शासनाने आणि पोलिसांनी घालून दिलेल्या कडक निर्बंधांमुळे या उत्सवाला साधेपणाने सुरुवात झाली.
उत्तर आणि दक्षिण पोलीस ठाणेकडून शासनाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करत सर्व मंडळांच्या अध्यक्षांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना जारी केल्याने मंडळाने सर्व नियमांचे पालन करत साधेपणाने हा उत्सव सुरू केला.
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. घटस्थापना करून या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाते.हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.
यानिमित्त आज प्रत्येकाच्या घरी वेगवेगळया पद्धतीने घट स्थापना करण्यात आली. दरम्यान आज दिवसभर नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भक्तिमय वातावरणात मिरवणूका न काढता प्रतिष्ठापना केली.दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६१ नवरात्र उत्सव मंडळानी प्रतिष्ठापना केली आहे तर उत्तरच्या हद्दीत अक्कलकोट शहरात १६ आणि ग्रामीणमध्ये २१ अशा ३७ ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.त्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि दक्षिणचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी मंडळाच्या ठिकाणी बंदोबस्त लावला आहे.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्व आढावा बैठक घेऊन या ठिकाणी सर्व मंडळांना सूचना केले आहेत तसेच कोरोना नियमांचे पालन करत हा उत्सव साजरा करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार या उत्सवाला सर्वत्र शांततेत सुरुवात झाली आहे.
कोरोना नियमांमुळे उत्साहाला ब्रेक
या वर्षीच्या सर्व सणावर कोरोनाचे तीव्र सावट पाहायला मिळाले.गणेशोत्सवात देखील आगमन आणि विसर्जन मिरवणूकावर बंदी होती. तशाच प्रकारचे नियम आणि अटी या उत्सवावर देखील
लागू केल्याने अंतर्गत मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.