अक्कलकोट : नवरात्र निमित्त आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवत अक्कलकोट येथील माशाळे बंधूंच्यावतीने घटस्थापनेच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक टँकर ( दहा हजार लिटर ) गोडे तेलाचे माफक दरात वाटप करण्यात आले. वाढत्या महागाईमध्ये माशाळे बंधूनी राबविलेल्या या उपक्रमास नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळाला.
अक्कलकोट येथील प्रतिष्ठित व्यापारी बसवराज माशाळे यांच्या परिवाराच्या वतीने गेली अनेक वर्षापासून ( पूर्वजांपासून ) नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गोड्या तेलाचे वाटप केले जाते. कोरोनाच्या महामारीमध्ये देखील माशाळे परिवाराच्या वतीने बहुतांश परिवारांना धान्याचे देखील वाटप करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मल्लिकार्जुन मंदिर समोरील त्यांच्या दुकानासमोर सुमारे 10 हजार लिटरचा टँकर उभा करून माफक दरामध्ये गोड्या तेलाचे वाटप करण्यात आले.
घटस्थापनेमध्ये घटासमोर लावण्यात येणार्या दिव्या करिता हा तेल मोठ्या प्रमाणात वापरला जातो व खाद्य पदार्थ बनविणे करिता देखील सर्वसामान्य नागरिक याचा वापर करतात. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाटप करण्यात आले अक्कलकोट शहरातील बुधवार पेठ, बस स्थानक परिसर, वेताळ चौक, गोल वस्ती, खासबाग, माणिक पेठ आदीसह ग्रामीण भागातील दहिटणे, हांजगी, सांगवी, हसापुर आदी गावातील नागरिकांनी याचा लाभ घेतला.