ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चिपी विमानतळाचे लोकार्पण कोकणच्या विकासाने भरारी घेतली, कोकणची संपन्नता जगासमोर येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथे आजपासून सुरू झालेल्या चिपी विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले असून खर्याअर्थाने कोकणच्या विकासाने भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आनंद झाला आहे. या विमानतळामुळे जगभरच्या पर्यटका बरोबरच उद्योजकही मोठ्या प्रमाणात येऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल. कोकणचे वैभव मोठे आहे. गोव्यापेक्षाही इथले समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. इथल्या स्थानिक उद्योजकांना, आंबा,काजू,फणस तसेच मासे निर्यातीला प्रोत्साहन व चालना मिळेल. या विमानतळाच्या निमित्ताने कोकणचे सौंदर्य जगासमोर जाणार असून येथील निसर्ग सौंदर्य आणि मातीचा सुगंध जगातील पर्यटकाला आकर्षित करेल.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विमानतळांचा विकास करण्याच्या दृष्टीने शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. येथे विमान बरोबरच
हेलिकॉप्टर सेवा ही सुरू झाल्यास पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. शासनाने पर्यटनाला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे उद्योजकानाही या भूमीत चांगली संधी आहे. लवकरच मुंबई -गोवा महामार्गाचे काम तसेच राज्यातील अन्य महामार्गाची कामे सुरु करण्यात येणार आहेत असे सांगून त्यांनी कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!