दुधनी : तालुक्यातील मैंदर्गी शहरात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत पावलेल्या प्रत्येक नागरिकाच्या स्मरणार्थ व त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एम्. एस. युथ फाउंडेशनच्यावतीने येथील नगरपरिषद सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला होता.याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदान शिबिराच उद्घाटन कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या सर्व नियम पाळून शिबिरात एकूण 81 जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यात तरुणांचा सहभाग अधिक होता.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नसून जिल्ह्यात व राज्यात विशेष करून सरकारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. त्यासाठी खास करून गरिबांचे हक्काचे मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील रक्तपेढीला रक्तसंकलन करण्यास आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपतत्रासोबत फाउंडेशन तर्फे एक नारळाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष महेश शावरी, गणेश गोब्बूर, शंकर हुग्गी, शिवू जकापुरे, नागराज अडाकुल, राज शावरी, दौलप्पा कोळी आदींनी परिश्रम घेतले.