जादा शुल्क व दंड आकारत असल्यास विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार नोंदवावी प्रभारी कुलसचिव डॉ. पवार यांचे आवाहन
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या पारंपारिक व व्यवसायिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश, परीक्षा व विविध शुल्क व दंड जादा आकारत असल्याचे निदर्शनास आले आहे, तरी महाविद्यालये विविध शुल्क व दंड जादा आकारात असल्यास विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पुराव्यासह तक्रार नोंदवावीत, असे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. एस. के. पवार यांनी केले आहे.
कोविड संकटामुळे विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क अथवा दंड घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश सरकारकडून महाविद्यालये व विद्यापीठांना देण्यात आली आहेत. तरीही काही महाविद्यालयांकडून कोविड संकटाचा व शासन आदेशाचा पालन न करता विद्यार्थ्यांकडून नियमबाह्यरित्या विविध शुल्क आकारण्यात येत असल्याचे समोर आले आहे. विशेषता व्यवसायिक महाविद्यालयांच्या अधिक तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या आहेत. महाविद्यालयांनी देखील कोणत्याही अधिकचे शुल्क अथवा दंड विद्यार्थ्यांकडून आकारू नये, असे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. पवार यांनी केले आहे.
ज्या महाविद्यालयांकडून अधिकचे शुल्क अथवा दंड आकारण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयाकडे अथवा [email protected] या ईमेल आयडीवर 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत तक्रार नोंदवण्याचे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. एस. के. पवार यांनी केले आहे. कोविड संकटामुळे विद्यार्थी व त्यांचे पालक आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत महाविद्यालयांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क आकारू नये व विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये. त्याच प्रकारे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, याची काळजी महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन देखील प्रभारी कुलसचिव डॉ. पवार यांनी केली आहे.