लातूर : अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीमुळे लातुर जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी भाजपने लातूरमध्ये 72 तासांचं अन्नत्याग अंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर ,आमदार रमेश कराड यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी नाशिक, उत्तर महाराष्ट्र तसेच संपूर्ण मराठवाड्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली. नदी, नाले तसेच ओढ्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण खरीप हंगाम गेलेला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांची मदत करावी, अशी मागणी भाजप म्हणजेच विरोधी पक्षाकडून केली जात आहे.
लातूरमध्ये भाजप नेते संभाजी पटील निलंगेकर याच मागणीला घेऊन आक्रमक झाले आहेत. त्यांनी 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात खुद्द संभाजी पाटील निलंगेकर तसेच आमदार रमेश कराड सहभागी झाले आहेत. तसेच या नेत्यांसोबत शेतकरी देखील उपस्थित आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 32 गावांनी चूल बंद आंदोलन करून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला रयत प्रतिष्ठान, दिव्यांग आघाडी, राष्ट्रीय समाज पक्षानेही जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, माजी आमदार शिवाजीराव पाटील-कव्हेकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांची उपस्थिती होती.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर व जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून सकाळी सुरू झालेल्या या आंदोलनाचा सुरुवात गंजगोलाई जगदंबा देवीचे दर्शन घेऊन, शहरातील महात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात झाली.
या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही मोठा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी सरकारच्या विरोधात असंतोष असून या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे.