अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोडला बॉंम्ब… अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केले “हे” आरोप…
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेवुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात भाजपवर आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बाँम्ब फोडू, असा इशारा दिला होता. त्यानुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह भजपचे इतर नेते उपस्थीत होते.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/VvpeZTlHNw
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2021
‘मुबंई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या जवळच्या माणसाकडून नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईत अत्यंत कवडीमोल दराने जागा खरेदी केली आहे. या प्रकरणातील दोन्ही व्यक्ती या टाडाखाली अटकेत होत्या. तरीही मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्याशी व्यवहार केले. यावरून मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तींसोबत जमीनीचे व्यवहार का केला? असा सवाल विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विचारला.
मंत्री नवाब मलिक यांनी गुन्हेगारांकडून जागा कशी विकत घेतली. ती सुद्धा इतक्या स्वस्तात. या आरोपींवर टाडा लावला गेला होता, मग ही संपत्ती जप्त केली जाऊ शकते म्हणून ती तुम्ही विकत घेतली का? अशा अजून ५ जमिनीचे व्यवहार आहेत. त्यातील ४ व्यवहारमध्ये अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. ही सर्व कागदपत्रे मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि संबधित एजन्सींना यांनाही देणार आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कुर्ला येथे १ लाख २३ हजार स्क्वेअर फूट जागा एलबीएस रोड येथे आहे. ही जागा सोलीडस इंवेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावे रजिस्टर आहे. ही कंपनी मंत्री नवाब मलिक यांची आहे. फरहाज मलिक यांनी ही जागा विकत घेतली आहे. २००५ ला याची खरेदी २०५३ (दोन हजार त्रेपन्न रुपये) रुपये प्रति स्क्वेअर फूटने ३० लाख रुपयांत खरेदी केली आहे. सलीम पटेल याच्या खात्यात १५ लाख रुपये व शहाब अली खान याच्या खात्यात १० लाख रुपये गेले आहेत. २००३ मध्ये हा व्यवहार सुरू झाला व २००५ ला हा व्यवहार संपला. तेव्हा नवाब मलिक मंत्री होते असे फडणवीस यांनी सांगितले.