---Advertisement---

सभागृहात निष्काळजीपणा सहन नाही; भाजपने आमदार-मंत्र्यांना थेट इशारा दिला

By team
On: March 12, 2026 11:06 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांच्या विधिमंडळातील वाढत्या गैरहजेरीवर आता पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “विरोधकांना कमी लेखून निष्काळजीपणे वागू नका आणि सभागृहातील कामकाज गांभीर्याने घ्या,” असा संदेश त्यांनी दिला आहे.

यापुढे कोणताही आमदार किंवा मंत्री सभागृहात अनुपस्थित राहणार असेल, तर त्याला त्याचे लेखी कारण पक्षाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विनाकारण गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भाजपच्या सूत्रांनुसार, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंत्र्यांच्या उपस्थितीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. वारंवार गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून ते संबंधितांच्या हातात देण्यात आले आहे, जेणेकरून उपस्थिती आणि सभागृहातील सहभाग यावर नियंत्रण ठेवता येईल.

यासाठी पाच आमदारांचा विशेष गट तयार करण्यात आला असून, त्या गटातील एका आमदाराकडे उपस्थिती आणि कामकाजात सहभाग याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित आमदार आपल्या गटातील सदस्यांची उपस्थिती आणि सक्रियता याची माहिती थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे देणार आहे.

जर एखाद्या आमदार किंवा मंत्र्याला महत्त्वाच्या बैठकीसाठी किंवा अन्य कारणासाठी सभागृहातून अनुपस्थित राहावे लागले, तर योग्य आणि लेखी कारण पक्षाला कळवणे अनिवार्य असे केले आहे. कोणतीही माहिती न देता अनुपस्थित राहिल्यास संबंधितावर पक्षाकडून कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कठोर निर्णयामुळे आता विधिमंडळातील उपस्थितीबाबत सर्व आमदार-मंत्र्यांवर अधिक जबाबदारी येणार असल्याचे मानले जात आहे. पक्षाच्या या पद्धतीमुळे सभागृहातील कामकाज अधिक नियोजित आणि सक्रिय राहण्याची अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!